सोलापूर - देश महासत्ता होण्याची स्वप्न बघत असताना, ५ ट्रिलियन्स इकॉनॉमीच्या उद्धिष्टपूर्तीकडे वाटचाल करत असतानाही ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते, वीज आणि पाणी या मूळ समस्यांनाच तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरातील एका नदीतून अंत्ययात्रा नेण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याची दखल घेतली. मात्र, पुन्हा एकदा तीच बिकट वाट सोलापुरातील मोहोळ येथे दिसून आली. आपल्या १ महिन्याच्या चिमुकल्यांसह नवबाळांतीण महिलेला नदीतून मार्ग काढावा लागला.
मोहोळ तालुक्यातील भोगावती-नागझरी या दोन नद्यांचा संगम झालेला असून नदीमध्ये सध्या कमरेएवढे पाणी आहे. त्यामुळे, वाळूज ते सोलापूर रोड पाण्याखाली गेला आहे. नदीपलीकडे दोनशे लोकवस्तीची जाधव वस्ती वास्तव्यास आहे. याच जाधव वस्तीत एक महिन्याची डिलीव्हरी ( बाळंतीण ) झालेली माहिला प्रिती प्रविण घाडगे आणि तिची आई रंजना जाधव यांनी बाळाला दवाखान्यात डोस देण्यासाठी नदीतून मार्ग काढला. या दोन्ही आया-बायांनी दगड धोंडे पार करत बाळाला दुसऱ्यांच्या मदतीने नदी पार करुन रग्णालयात नेले. ग्रामीण भागातील या महिलांचा इवल्याशा लेकरासह झालेला हा जीवघेणा प्रवास नक्कीच भारताच रौप्य महोत्सवी वर्षे साजरा करणाऱ्या देशाला लाजविणार आहे. त्यामुळे, प्रशासनाने आणि सरकारने याची दखल घेत नदीवर पूल बांधण्याची संवेदनशीलता दाखवायला हवी.
दरम्यान, पावसाळ्यात याच नदी मार्गातून शेतकरी, शाळकरी मुले दररोज कपडे भिजवत नदी पार करतात. येथील नागरिकांची बऱ्याच दिवसापासून पूल व्हावा अशी मागणी आहे. मात्र, ही मागणी पूर्णत्वास कधी जाईल हे कोणालाही माहिती नाही. तोपर्यंत किती जीवांचा खेळ होईल हे देवच जाणे.