पंढरपूर : संचारबंदी विरोधात मागील तीन दिवसांपासून आंदोलन करून देखील पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली. संतप्त संचारबंदीच्या पहिल्या दिवशी प्रदक्षिणा मार्गावर ठिय्या आंदोलन केले. मात्र, प्रशासनाने दखलच घेतली नाही. यामुळे व्यापा-यांना आंदोलन मागे घावे लागले.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच पंढरपुरात कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंढरपुरातून तिस-या लाटेचा उगम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपूर तालुक्यात शुक्रवारपासून संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या विरोधातहरातील व्यापा-यांनी व विविध संघटनेच्यावतीने दुकाने उघडीच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु संचारबंदीच्या पहिल्या दिवशी दुकाने उघडे असलेल्या परिसरात पोलीस गाडी फिरली. यावेळी पोलिसांनी व्यापा-यांना दुकाने बंद ठेवा, कायद्याचे पालन करा, असे आवाहन करताच दुकाने बंद केली. परंतु काही व्यापा-यांनी पोलिसांच्या या वर्तुणुकीलादेखील विरोध करत, प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरीक्षक अरुण पवार, किरण अवचर, सपोनि. कपिल सोनकांबळे, सुधीर घुले यांनी भेट दिली.
तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सत्यविजय मोहळकर यांनी व्यापा-यांच्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या; तुम्ही दुकाने बंद करा, असे आवाहन प्रशासनाने करताच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
----
नगरपालिकेने कर माफ करावा
प्रशासनाकडून आम्हाला सतत दुकाने बंद ठेवा, अशा सूचना दिल्या जातात. सततच्या संचारबंदीमुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. मात्र, नगरपालिकेचा कर प्रत्येक महिन्याला असतोच, यामुळे नगरपालिकेने कर माफ करावा, अशी मागणी व्यापारी संघटनेतील पदाधिका-यांनी केली.
---
दोन्ही आमदार तोंड लपवून बसतात
दुकाने उघडण्यासाठी आंदोलन करूनदेखील अधिकारी ऐकत नाही. हे पाहून संतप्त झालेल्या एका व्यापा-याने आमदार काय करत नाहीत. दोन्ही आमदार तोंड लपवून बसतात. ‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
---
फोटो :
विठ्ठल मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर ठिय्या आंदोलन करताना व्यापारी.