सोलापूर : कोरोनामुळे शहरातील सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. याचा परिणाम इतर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर होत आहे. या रुग्णांना उपचार मिळण्यास वेळ लागत आहे. दीड महिन्यापासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्वच रुग्णालयातील बहुतांश तज्ञ डॉक्टर्स, कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारामध्ये व्यस्त आहेत. इतर आजाराने बाधित असलेल्या रुग्णांवरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.
काही जणांच्या अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यास विलंबही लागत आहे. सिविल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना १० ते १५ दिवसानंतर येण्याचे सल्ले दिले जात आहेत. संर्पदंश, हृदयविकाराचा झटका, अपघातातील गंभीर जखमी, पॅरालिसीस यासारख्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. या रुग्णांना कोरोनाची बाधा नाही, तरीही रुग्णालये त्यांना दाखल करुन घेण्यास नकार देत आहेत. अशावेळी नेमके या रुग्णांनी जायचे तरी कुठे ? असा यक्षपश्न त्यांच्यापुढे उभा टाकला आहे.
५० रुग्णालयातील २७६१ पैकी २१०६ बेड राखीव
- शहरातील ५० रुग्णालांमधील २०१६ बेड कोरोनाबाधीत रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
- कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असेल आणि एखाद्या रुग्णाची ऑक्सीजन लेवल कमी असेल तर ही रुग्णालये त्या रुग्णाला दाखल करुन घेण्यास नकार देतात. मूळात या सर्व रुग्णालयातील बेड हाऊसफुल्ल आहेत.
- आयसीयू, व्हेटींलेटर बेडसाठी वेटींग आहे. यातूनच त्यांना मार्ग काढण्यात अडचण येत आहे.