कुर्डूवाडी : एटीएम फोडून ११ लाख ४२ हजार लंपास केल्याप्रकरणी सहा संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांना भोपाळमध्ये ताब्यात घेतले आहे. हे सहा जण हरियाणा आणि राजस्थानमधील असून, त्यांना भोपाळमधून ताब्यात घेऊन प्राथमिक तपासासाठी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान येथील माढा रोडवर बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून ११ लाख ४२ हजार ५०० रुपये पळविले होते. दरम्यान, भोपाळ येथे परवलिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशाच प्रकारे चोरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांना स्थानिक पोलिसांनी मध्यरात्री गस्त घालताना पकडले होते. या सहाही आरोपींनी तपासादरम्यान दिलेल्या जबाबात सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणचे एटीएम मशीन फोडून रक्कम पळविल्याची कबुली दिली.
---
कोण आहेत संशयित चोरटे
समशेर ऊर्फ दलशेर फजरू (वय ४०, रा. गंगोरा, पो.व ता.पहाडी, जि.भरतपूर, राजस्थान), साहाजत ऊर्फ शहादत ऊर्फ हाजर खान (वय २५, रा. पिनगुवाॅ, ता.पुन्हाना, जिल्हा नूह, हरियाणा), शाकिर फजरू (वय ४०, रा.गंगोरा, पो.व ता.पहाडी, जि. भरतपूर, राजस्थान ), आसमोहम्मद फजरुद्दीन (वय ३४, रा, नांगली पठाण, पो. लंगडवास, ता. किशनगढ, जि.अलवर, राजस्थान), मसी उल्लाह अख्तर (वय २१, रा.रामपुरी, ता. नूह मेवात, हरियाणा), मुशरीफ खान शरीफ कमरुद्दीन खान (वय २७, रा. सरस्वास, ता. पराणा, जि. नूह, हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
---
ट्रान्स्फर वॉरंटद्वारे घेतले ताब्यात
कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे,पोलीस शिपाई दत्ता सोमवाड, राहुल रकिबे, सागर गवळी, दाढे, पठाण यांच्या पथकाने ट्रान्सफर वाॅरंटद्वारे या संशयित आरोपींना भोपाळ येथून ताब्यात घेतले. त्यांना रविवारी माढा येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.
........