बार्शी : चांदणी नदी तुडुंब भरून वाहत असल्याने धस पिंपळगाव, कांदलगाव, चुंब, मांडेगाव, वालवड, देवगाव पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद आहेत. मागील महिन्यात पडत असलेल्या पावसामुळे निम्मे दिवस हे पूल बंदच राहिले होते. या नदीवर असलेले वालवड, चारे, कळंबवाडी हे तीन लघू पाटबंधारे आणि बाभूळगाव हा मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला. या मोसमात ७५ टक्के भरलेला पाथरी प्रकल्प एकाच रात्रीत शंभर टक्के भरून सांडवा सुटला.
शुक्रवारी, शनिवारी मध्यरात्री उत्तर बार्शीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नद्यांना पूर आला असून उडीद, सोयाबीन, कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरातही पाणी घुसले. तालुक्यात आतापर्यंत ५५२ मि.मी. पाऊस पडला आहे. उत्तर बार्शीच्या बाजूला बालाघाटच्या डोंगर रांगा आहेत. याच भागात उगम पावलेल्या नद्या तालुक्यातून वाहत आहेत. दोन दिवसाच्या पावसामुळे नीलकंठा, चांदणी नदीला महापूर आला. महिन्यात चौथ्यांदा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कांदा, सोयाबीन पिकांसह काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या उडदाला मोठा फटका बसला आहे. मागील पंधरवड्यात ही आगळगाव मंडळात सर्वाधिक ७० मि.मी. पाऊस झाल्याने चांदणी नदीला महापूर आला होता. याच भागात सोयाबीनची लागवड जास्त अन् फटकाही जास्त बसला. या पावसामुळे उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उडदाचा दर हा निम्म्यावर आला आहे.
---
दोन दिवसाच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, कांद्याचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई अथवा विमा मंजूर करावा.
- सुधीर जाधवर, सोयाबीन उत्पादक
---
घोर ओढ्याला पूर
या पावसामुळे बार्शीजवळील घोर ओढ्याला पाणी आले होते. त्यामुळे बार्शी-लातूर आणि बार्शी-उस्मानाबाद-तुळजापूर या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने सकाळी उशिरापर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद होती.