सोलापूर : माढा लोकसभा निवडणुकीसाठी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामचंंद्र शिंदे यांच्या कार्यालयात गुरुवारपासून उमेदवारी अर्ज वितरण व स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी माण व फलटण तालुक्यातील ६, माळशिरस तालुक्यातील ८ तर माढा तालुक्यातील ६ जणांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. दुपारी तीनपर्यंत ३८ जणांनी ७५ अर्ज घेतले आहेत. माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांनी वंचित बहुजन आघाडीकरिता अर्ज घेण्यात आला आहे.
सोलापुरातील होबर पार्टीकरिता एजाज शेख यांनी चार अर्ज घेतले आहेत. सातारा येथील विजयानंद शिंदे यांनी अखिल भारतीय हिंदू महासभेकरिता तीन अर्ज घेतले आहेत. कुर्डूवाडी येथील शहाजहान शेख यांनी बहुजन महापार्टीकरिता दोन अर्ज घेतले आहेत. पंढरपूर येथील नवनाथ पाटील यांनी हिंदुस्थान प्रजा पक्षाकरिता अर्ज घेतला आहे. माढा येथील ब्रह्माकुमारी प्रमिला बेन यांनी अखिल भारतीय एकता पार्टीकरिता एक अर्ज घेतला आहे. पंढरपूर तालुक्यातील मारुती केसकर यांनी बहुजन आझाद पार्टीसाठी तीन अर्ज घेतले आहेत.
पुणे येथील चिंचवडचे भाग्येश पाटील यांनी अपक्ष म्हणून चार अर्ज घेतले आहेत. माढा तालुक्यातील तांदूळवाडी येथील गणपत भोसले, मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील सचिन गवळी, सांगोला तालुक्यातील उमेश मंडले यांनी, मोहोळ तालुक्यातील नवनाथ आवारे, सोलापुरातील दत्तात्रय थोरात, कुर्डूवाडीचे मीरा शिंदे, मलिकपेठ येथील सिद्धेश्वर आवारे यांनी, सोलापुरातील बसवराज आळगी, कुर्डूवाडीचे सुनील अस्वरे, माढा तालुक्यातील आढेगाव येथील विठ्ठल ढवरे, मोहोळ तालुक्यातील भारत गिरी, पंढरपूर तालुक्यातील दिलीप पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज घेतला आहे.
सोलापुरातील हर्षवर्धन कमळे, सांगोला तालुक्यातील दिलीप जाधव, दत्तात्रय खटके, सोलापुरातील रोहित मोरे, वेळापुरातील सुनील जाधव, माळशिरस तालुक्यातील विजयराज माने-देशमुख, खंडाळीचे रणजितसिंह कदम, सदाशिवनगर येथील दत्तात्रय करे, सोलापूरचे महेश कोडम, माळशिरस तालुक्यातील बापूराव रूपनवर, म्हसवडचे अजिनाथ केवडे, माढा तालुक्यातील नानासाहेब यादव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज घेतला आहे.
बढे पक्ष निवांतच- माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अद्याप राष्ट्रवादीससह इतर मोठ्या पक्षांनी एकही अर्ज विकत घेतला नाही. अद्याप भाजपच्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले नाही. यामुळे भाजपचा प्रश्न येत नसला तरीही राष्ट्रवादीने अर्ज न घेता अद्याप निवांत रहाणेच पसंत केले आहे. गतवेळी माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपच्या युतीतून निवडणूक लढविली होती. यंदा ते काँग्रेससोबत असल्याने त्या पक्षाचा प्रश्नच येत नाही. सध्या भाजपच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे.