सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघापैकी सहा जागांवर शिवसेना लढणार हे आज स्पष्ट झाले़ भाजपाच्या यादीत विद्यमान दोन मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली़ मात्र अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा आणि माळशिरस या पुर्वी भाजपाकडे असलेल्या मतदारसंघात कोण लढणार याचा उल्लेख नव्या जागा वाटपाच्या यादीत नाही.
जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ (राखीव), सोलापूर शहर मध्य आणि सांगोला या सहा जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार असल्याचे जागा वाटपानंतर जाहीर केलेल्या यादीवरून स्पष्ट झाले़ बार्शीत माजी आमदार दिलीप सोपल, सांगोल्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि मोहोळमध्ये नागनाथ क्षीरसागर यांची उमदेवारी शिवसेनेने निश्चित केली आहे़ मात्र करमाळा, माढा आणि शहर मध्यचा तिढा दुपारपर्यंत सुटला नाही़ दरम्यान, शहर मध्यचा ए-बी फॉर्म जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे देण्यात आल्याचे समजते़ माढ्यात राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांना उमेदवारी देण्यात सावंत यांनी पुढाकार दाखविला असला तरी तालुक्यातील सर्व शिंदे विरोधक सावंत यांना भेटण्यासाठी पुण्याकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, भाजपने पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची नावे अनुक्रमे शहर उत्तर तसेच सोलापूर दक्षिण मतदारसंघात अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केली आहेत़ मात्र पंढरपूर आणि अक्कलकोट हे दोन मतदारसंघ मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला सोडण्यात आली असून याठिकाणची नावे अद्याप जाहीर झाली नाहीत़ माळशिरसमध्ये मात्र मोहिते-पाटील गटाने सुचविलेले नावच फायनल होईल, असे सांगण्यात आले.