कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. कारण अनेक रुग्ण तालुक्याच्या ठिकाणी येऊन क्वॉरण्टाइन होण्यास टाळाटाळ करीत आहेत. याचा विचार करून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मोठमोठ्या गावाच्या ठिकाणी कोविड हेल्थ सेंटर उभारण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार तालुका पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांना सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी करीत अक्कलकोट तालुक्यात मंगरूळ, करजगी, जेऊर, नागणसूर, सलगर, वागदरी या सहा गावात नवीन कोविड हेल्थ सेंटर सुरू करायचे निर्णय घेतला आहे. मंगरूळ, करजगी, सलगर या तीन ठिकाणी हायस्कूलमध्ये तर जेऊर येथे मंगल कार्यालयात, नागणसूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे सेंटर सुरू केले. याठिकाणी वीज, पाणी, शौचालय, बेड, पंखा आशा प्रकारची सुविधा उपलब्ध केली आहे.
घरूनच आणावा लागणार चहा, नास्ता, जेवण
या कोविड सेंटरमध्ये चहा, नास्ता, जेवण हे रुग्णांच्या घरून आणायचे आहे. यामुळे रुग्णांना दिलासा मिळून धास्ती कमी होण्यास मदत होणार आहे. सलगर या गावी या कोविड हेल्थ सेंटरमध्ये सर्वकाही सुविधा निर्माण करण्यासाठी ३० हजार रुपये लोकवर्गणी जमा झालेली आहे.
कोट :::::::
वाढती रुग्णसंख्या पाहता सीईओ दिलीप स्वामी यांच्या सूचनेनुसार तालुक्यात ग्रामीण भागात सहा ठिकाणी कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे. गरजेनुसार उद्घाटन करण्यात येणार आहे.
- महादेव कोळी,
गटविकास अधिकारी