अक्कलकोट : तालुक्याच्या सीमावर्ती भागात सिन्नूर येथे शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत १ लाख ६,५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच या कारवाई दरम्यान पाच जणांना ताब्यात घेऊन अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू होता. कर्नाटकातील श्रीमंत व्यक्ती या ठिकाणी येऊन जुगार खेळायचे. बुधवारी स्थानिक पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करत १ लाख ६,५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १२ मे रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता पोलिसांनी धाड टाकली. याबाबत दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास दुधनी पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळाली. अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी सिन्नूर येथील जलानी पठाण यांच्या शेतातील बांधावर धाड टाकली. यावेळी लिंबाच्या झाडाखाली घोळका करून पत्त्याचा मन्ना नावाचा जुगार सुरू होता. धरपकड सुरू होताच जुगार खेळणारे पळत सुटले. त्यांचा पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश लांमजाणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोसले, शेख व शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---
वाहने जप्त
या कारवाईत यमनप्पा शरणाप्पा माहूर (५५), सलीम गुडूसाब गौर (४०), चांद इब्राहिम पठाण (३५), कांतू शिवाप्पा मांग (२८, सर्व रा. सिन्नूर), नामदेव गोमू राठोड (३०, रा. गांधीनगर तांडा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना चार मोबाइल, एक मोपेड (एम.एच. १२, एस. बी. ३१७५), मोटरसायकल (एम एच १३ सी आई ८८७९) आणि ९ हजार ३० रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.