अक्कलकोट : अक्कलकोट येथे एकाच कुटुंबातील ८८ वर्षांचे माजी नगराध्यक्ष व पाच वर्षांच्या बालकासह तब्बल सहाजणांना एकाचवेळी कोरोनाने घेरले होते. त्यापैकी दोघे सोलापुरात तर उर्वरित चौघे स्थानिक क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेऊन ठणठणीत झाले आहेत. सकारात्मक दृष्टी आणि न घाबरता वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला पाळल्यामुळेच हे शक्य झाल्याचे ते सांगतात.
दुसऱ्या लाटेत अक्कलकोट शहर व तालुक्यात एकाच कुटुंबात सहाजणांना कोरोना होऊन कमी वेळात बरे होणारे पहिले कुटुंब आहे. अक्कलकोट येथे लांडगे नामक मोठे कुटुंब. त्यापैकी अक्कलकोट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैजीनाथ लांडगे (वय ८८), त्यांचा मुलगा राजेंद्र लांडगे (६३), सून मनीषा राजेंद्र लांडगे (५०), नात रोहित राजेंद्र लांडगे (३३), रोहितची पत्नी स्नेहल रोहित लांडगे (२७), मुलगा रोहित लांडगे (५) या सहाजणांच्या संपूर्ण कुटुंबाला एकाचवेळी कोरोनाने घेरले होते.
त्यामुळे सर्वजण अक्कलकोट येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले. उपचार सुरू असताना वैजिनाथ लांडगे व सून मनीषा लांडगे यांना त्रास जाणवू लागल्याने सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सहा दिवसांत उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले. तसेच अक्कलकोट सेंटरमध्ये असलेलेसुद्धा बरे होऊन घरी आले. असे एकाच कुटुंबातील एका ८८ वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती व एक पाच वर्षीय लहान बाळ यामध्ये सुखरूपपणे घरी परतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाचे लक्षणे दिसता क्षणी तत्काळ तपासणी करून घेतली. सेंटरमध्ये डॉ. गजानन मारकड, डॉ. शिवलीला माळी यांनी योग्य उपचाराबरोबर कोरोनासंबंधी मार्गदर्शन केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषध, योगासन, सकस आहार, भरपूर झोप हे तीन सूत्र योग्य पद्धतीने हाताळले तर लवकर माणूस कोरोनातून कसा बरा होऊ शकतो हे लांडगे परिवाराच्या बोलण्यावर लक्षात येते.
-----
संपूर्ण कुटुंबाला एकाच वेळी कोरोनाची लागण झाली. आम्ही वेळीच तपासणी, उपचार करून घेतले. कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता नियमित औषध, गोळ्या घेतल्या. डॉक्टरांचा सल्ला पाळला. त्यामुळे मी ८८ वर्षांचा असूनही माझ्या पाच वर्षांच्या पणतूसह सहीसलामत बाहेर पडलो. कोरोना झालेल्यांनी वेळीच डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.
- वैजीनाथ लांडगे, माजी नगराध्यक्ष, अक्कलकोट
----
कोरोना संकटातून बरे होऊन आल्यानंतर संपूर्ण कुटंब. उजवीकडून मनीषा, राजेंद्र, वैजीनाथ, रोहित, स्नेहल दिसत आहेत.