सोलापूर : सोशल मीडियावरचे अपघाताचे काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करतात. सामान्य नागरिकांना आश्चर्य वाटतं यात काही नवल नाही, पण कधीकधी असे व्हिडीओ तोंडात बोटं घालायला लावतात. जीप सातवेळेस पलटी होऊनही तीन चिमुकल्यासह सहा जण बचावले आहेत. मृत्यूला चकवा देणारी ही घटना पंढरपूर तालुक्यात करकंब या गावाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
अपघातात दोघी बहिणींनी प्रत्यक्ष मृत्यूचा थरार अनुभवला. यामुळेच काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला. मंगळवेढा तालुक्यात भोसे येथील बंडू जगताप यांच्या शुद्धी जगताप (वय १०), स्वरा जगताप (वय ८) या दोन्ही मुली उन्हाळी सुट्टीसाठी आत्याच्या गावी पुणे येथे जात होत्या. या गाडीमध्ये दोन महिला, एक मुलगा व तीन मुली होत्या.
करकंबजवळ एका पेट्रोल पंपासमोर जीपमध्ये अचानक बिघाड होऊन काही सेकंदात ती सातवेळा पलटी झाली. या भीषण अपघातात रमेश गायकवाड हे बाहेर फेकले गेले व रस्त्यावर डोके आपटल्याने काही क्षणात गतप्राण झाले. मात्र जीपमधील शुद्धी, स्वरा या दोघी बहिणी फुटलेल्या काचेतून सुखरूप बाहेर आल्या. परी गायकवाड ही चिमुकलीसह इतरांना बाहेर येण्यास मदत केली. तसेच इतर दोन महिला, एक मुलगा, एक मुलगी असे चौघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही बहिणींनी मृत्यूचा थरार पहिला.