बीबीदारफळमध्ये कोरोना व हृदयविकाराच्या धक्क्याने मरताहेत लोक
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : कोरोनामुळे तसेच कोरोनामुळे सुरू असलेले हाल ऐकून मानसिक धक्का बसल्याने एकाच दिवशी सहा व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे बीबीदारफळ येथे एका महिन्यात मृत्यू झालेल्यांची संख्या आता २७ झाली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ, कौठाळी, वडाळा, रानमसले येथे कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज तपासण्या व लसीकरण सुरू असले, तरी रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यात बीबीदारफळ गाव सर्वात पुढे आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ९० रुग्णांची वाढ झाली तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सोमवारी दुपारपर्यंत बीबीदारफळ येथील सहा व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात कोरोना झालेल्या, आजारी व कालपर्यंत व्यवस्थित असलेले मात्र गावातील परिस्थिती ऐकून धक्का बसल्याने काहींना जीव गमवावा लागला आहे.
-----
खांदेकरीही तयार नाहीत
दररोज लोक मरु लागल्याने गावात घबराट पसरली आहे. सोमवारी सहा लोक मयत झाले. खांदा द्यायलाही कोणी तयार नाही. त्यामुळे मृतांना रिक्षातून स्मशानात प्रेत पोहोच करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली.