सोलापूर/कुर्डुवाडी : मुंबईहून कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर बंदोबस्तासाठी आलेल्या दहा जवानांपैकी सहा जवान कोरोना पाॅझिटीव्ह आढळले असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
याशिवाय वळसंग येथेही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. आता ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या 80 झाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की मुंबई हेडकाँर्टरमधून सोलापूर झोनसाठी आरपीएफचे १० जवान बंदोबस्तासाठी आले होते. सोलापूरला पोहचल्यानंतर तेथून त्यांना कुर्डुवाडी येथे पाठविण्यात आले. कुर्डुवाडी येथे तीन जूनच्या रात्री बॅरेकमध्ये ते झोपले व दुसऱ्या दिवशी ४ जून रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर कुर्डुवाडी रेल्वे दवाखान्यात तपासणीसाठी पाठविले असता त्यांना ताप व खोकला असल्याने व ते मुंबई येथून आल्याकारणाने पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठविण्यात आले होते.
आज रविवारी सिव्हिल हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार त्या १० जवानांपैकी ६ जवानांचे निदान कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे रेल्वे सूत्राकडून कळाले. याबाबत तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा व रेल्वेची विभागाची यंत्रणा सतर्क झाली असून जवानांबाबत अधिक चौकशी करत आहेत.