सोलापूर : मीटरमध्ये फेरफार करणे, पट्टी टाकणे, तारेवर आकडा टाकून वीज वापरणाºया वीजचोरांना महावितरणने चांगलाच शॉक दिला आहे़ मागील सहा महिन्यांच्या कालावधीत महावितरणने ११५७ वीज ग्राहकांवर कारवाई केली आहे. दरम्यान, वीज चोरीप्रकरणी २४ वीजचोरांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.
महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात वीजचोरांवर कारवाई करण्याचे धाडसत्र सुरू आहे़ त्यासाठी महावितरणने खास पथके तयार केली आहेत़ वीजचोरीच्या घटना उघडकीस आणताना वीजचोरीची बहुतांश प्रकरणे ही वीज मीटरमध्ये फेरफार करणारी असल्याची आढळून आली. कमी वीज बिल आकारण्यासाठी अनेक ग्राहकांकडून मीटरमध्ये फेरफार करण्यात येतो. यासाठी लोहचुंबक वापरण्यापासून वीजपुरवठा करणाºया तारांमध्ये बदल करण्यापर्यंतच्या क्लृप्त्या लढविण्यात येतात. यामुळे नेहमीपेक्षा कमी वीज बिल येते. ही फसवणुकीची प्रकरणे अधिक प्रमाणात आढळून येतात.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक वीजचोरी ही अकलूज विभागातील अकलूज, वेळापूर, माळशिरस, नातेपुते उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाºया गावांमध्ये होत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी शहर उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाºया गावांमध्येही चोरीचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, सोलापूर शहरात वीजचोरीचे प्रमाण कमी असल्याचे महावितरणने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे़
२४ वीजचोरांवर झाला गुन्हा दाखल- एखाद्या महावितरणच्या अधिकाºयाने वीजचोरी पकडली तर संबंधित वीज ग्राहकाला दंड केला जातो़ तसेच यापुढे वीजचोरी करू नये, याबाबत तंबी दिली जाते़ जर संबंधित वीज ग्राहकांनी दिलेल्या मुदतीत दंड भरला नाही तर त्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते़ असेच दंड न भरलेल्या २४ वीजचोरांवर विद्युत कायद्याच्या कलम १३५ मधील तरतुदीनुसार सोलापूर मंडल विभागातील अधिकाºयांनी गुन्हा दाखल केला आहे़
वीजचोरी रोखण्यासाठी सोलापूर मंडलात भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. पथकाच्या माध्यमातून वीजचोºया उघडकीस आणण्यात येत आहेत़ संबंधितांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे़ कोणत्याही वीज ग्राहकाने वीजचोरी करू नये़ महावितरणच्या सर्वच योजनांचा लाभ घ्यावा़- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल
अशी आहे वीजचोरांची आकडेवारी...विभाग तपासणी वीजचोर
- अकलूज २६१० ५८५
- बार्शी १४७ ५९
- पंढरपूर ७१८ ८९
- सोलापूर ग्रामीण २८६ २४९
- सोलापूर शहर २२ ०७
- एकूण ३७८३ ११५७