करकंब : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन अनेक भाविक पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. रविवारी नाशिक ते पंढरपूर हे ३४० किमीचे अंतर पार करीत ६०० सदस्यांची सायकलवारी पंढरीत दाखल झाली़ यातील काही सदस्य हे वर्षभर, सहा महिने तर किमान दोन महिने तरी सराव केल्यानंतरच या सायकलवारीत सहभागी होतात, असे समीर मुळे, सुधीर कराड, सुधीर शिंदे यांनी सांगितले.
नाशिक येथील सायकलिस्ट संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी आषाढी वारी सोहळ्यापूर्वी सायकल वारी काढली जाते. प्रवासादरम्यान ‘सायकल चालवा, इंधन वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, निरोगी राहा, प्लास्टिक बंदी करा, बाललैंगिक अत्याचार थांबवा’, असे संदेश दिले जातात़ सर्व सदस्यांचा एकसारखा रंग, एकसारखी सायकल, रस्त्याच्या एकाच बाजूने एका रांगेत, शिस्तीने मार्गस्थ होतानाचे दृश्य सर्वांना आकर्षित करून घेते़, असे अनंत झंवर, डॉ़ गणेश कोळपे यांनी सांगितले.
आठव्या वर्षी नाशिक येथून २८ रोजी ही सायकल वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली़ पहिल्या दिवशी १५० किलोमीटरचे अंतर पूर्ण करून अहमदनगर येथे मुक्कामी आली़ दुसºया दिवशी २९ रोजी १४५ किलोमीटरचे अंतर पार करून टेंभुर्णी येथे मुक्काम केला़ त्यानंतर ३० रोजी टेंभुर्णी ते पंढरपूर असे ४५ किलोमीटरचे अंतर पार करीत सकाळी ११ वाजता पंढरीत दाखल झाली.
नाशिक सायकलिस्टच्या वतीने प्रेसिडेंट प्रवीण कांबीया यांच्या मार्गदर्शनाखाली या वारीचे नियोजन करण्यात येते़ या सायकलवारीत ६०० सदस्यांमध्ये पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचाही समावेश असतो़ या सायकलिस्ट संघटनेत डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक आणि व्यावसायिकांचा समावेश असतो.
सामाजिक संदेश- सायकलवारीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी एक वेगळा सामाजिक संदेश घेऊन पंढरपूरला येतो. या वर्षीच्या वारीत नाशिक ते पंढरपूर मार्गावरील महाविद्यालयात आणि गावोगावी वाढत्या बाललैंगिक अत्याचार विरोधात मार्गदर्शन केल्याचे डॉ. मनीषा मुंदडा यांनी सांगितले.
सहा दृष्टीहीनांची सायकलवारी- प्रत्येक वर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम असतो़ यंदाच्या वर्षी सहा दृष्टीहीन सायकलस्वारांना नाशिक ते पंढरपूर सायकलवारीचा प्रवास घडविण्याचे ठरविले़ त्यानुसार सायकलीचेच आणखी एक चाक जोडून एकाच सायकलीला जोडली़ पुढे दृष्टी असलेली व्यक्ती सायकल चालविते तर मागे दृष्टीहीन व्यक्ती केवळ पायडल हलवून पुढील व्यक्तीला मदत करतो़ असे सहा दृष्टी सदस्यांनी नाशिक ते पंढरपूर अशी सायकलवारी पूर्ण केली आहे.
नियमावली अन् दैनंदिनी...- नाशिक सायकलिस्ट संघटनेने सदस्यांसाठी नियमावली स्पष्ट केली आहे़ पिण्याचे पाणी सोबत आपल्याच बॉटलमध्ये घ्यावे़ तीन दिवसांच्या कालावधीत दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, मावा याचे सेवन करायचे नाही़ रस्त्यावरून सर्वांनी एका रांगेत जायचे़ आपल्यामुळे दुसºयांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची़ प्रवासादरम्यान मोबाईलवर बोलायचे नाही, अशी ही नियमावली आहे़ शिवाय रोज पहाटे ५ वाजता उठून ६ वाजता ३० किमी सायकल वारी करणे त्यानंतर चहा, नंतर ३० किमी अंतर पार केल्यानंतर नाश्ता, पुन्हा ३० किमी अंतर पूर्ण केल्यानंतर थोडी विश्रांती़ पुन्हा १५ किमी अंतर पूर्ण केल्यानंतर दुपारचे जेवण़ त्यानंतर २० किमी अंतर पूर्ण केल्यावर दुपारचा चहा आणि शेवटी २० किमीचे अंतर पार केल्यानंतर रात्रीचे जेवण आणि मुक्काम.
सायकल वारीत सहभाग नोंदविलेल्या अवघ्या नऊ वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला़ त्यामुळे यंदाच्या सायकलवारीत आम्ही शोकाकुल आहोत़ परिणामी यावर्षी पंढरपूर येथील सायकल रिंगण सोहळा आम्ही रद्द केला आहे़ - हरीश बैजल, सदस्य, नाशिक सायकलिस्ट
आमच्या सोबत साहित्य घेऊन ८ ट्रॅव्हल्स आणि ७ ट्रक आहेत़ शिवाय स्वयंपाकीही आहेत़ दुपारच्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची सोय केली जाते़ पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर परत ट्रॅव्हल्सने जातो़ शिवाय सायकली ट्रकमधून परत नेल्या जातात़ - सुधीर कराड, शिक्षक सदस्य