महेश कुलकर्णी सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत गेल्या चार टर्मपासून सत्तेत असणारे दशरथ गोप आणि त्यांच्या उमेदवारांना पुन्हा एकदा पाचव्यांदा कौल मिळाला आहे. गोप यांनी सभासद करून घेतलेल्या ६०० मतदारांनी पुन्हा त्यांना तारले आहे. समाजातील वरिष्ठांनीही उघड विरोध टाळल्यामुळे परिवर्तन झालेच नाही. गोप यांच्या विरोधात निवडणुकीआधीच वातावरण निर्माण करणाºया महेश कोठे यांनी भविष्यातील विधानसभेला विरोध नको म्हणून तटस्थ राहणे पसंत केले.
गेल्या वर्षी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या निवडणुकीत कोठे यांच्या अध्यक्षपदाचा विरोध करण्यासाठी दशरथ गोप, सुरेश फलमारी, आनंद इंदापुरे यांच्यासह इतर विश्वस्तांनी जोरदार पुढाकार घेतला होता. गोप विरुद्ध कोठे वाद विकोपाला गेला होता. हा हिशोब चुकता करण्यासाठी कोठे यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.
गोप यांना विरोध करणारे कोठेंच्याबरोबर गेले. दरम्यानच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले. गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत वाद होऊन युती मोडली होती. यामुळे कोठे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निसटत्या मतांनी पराभूत झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली आणि हीच युती विधानसभेलाही होणार असल्यामुळे कोठे यांच्या आमदार होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. नेमकी हीच गोष्ट गोप यांच्या पथ्यावर पडली.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोठे यांनी गोप यांना विरोध केला असता तर गोप यांनी निवडणुकीत कोठे यांना जोरदार विरोध केला असता. बहुसंख्य तेलुगू भाषिक मतदार हा भाजपला मानणारा आहे. भाजप-शिवसेनेची युती असल्यामुळे हे मतदान आपसुकच आपल्याकडे येईल, हा अंदाज बांधून मतांचे विभाजन टाळण्यासाठी महेश कोठे तटस्थ राहिले.
ज्ञाती संस्थेच्या वादावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत गोप यांच्या विरुद्ध पॅनल उभे करणार अशी घोषणा कोठे यांनी केली होती. या घोषणेमुळे गोप यांना विरोध करणारे कोठेंच्याबरोबर आले होते. त्यांनी यांना काहीही करा, गोप यांच्याविरोधात पॅनल उभे करा, अशी मागणी कोठेंकडे केली होती. कोठेंनी मध्यस्थीचा प्रयत्न केला खरा पण येणाºया विधानसभेचा विचार करून तटस्थ राहणे पसंत केले.
गोप ठरले किंगमेकर- कोठे यांनी समझोत्याचे प्रयत्न सुरू केले. समाजातील ज्येष्ठ आणि उच्चशिक्षित लोकांना एकत्र करून निवडणुकीआधीच गोप यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नांना गोप यांच्या गटाने खो घातल्यामुळे निवडणूक लागली. कोठे यांचे विश्वासू सहकारी जनार्दन कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे करण्यात आले. कारमपुरी यांच्यामुळे काही प्रमाणात निवडणुकीत चुरस निर्माण झाली. मात्र ६०० सभासदांच्या जीवावर गोप पुन्हा एक किंग आणि किंगमेकर असे दोन्ही ठरले आहेत.