पंढरपूर : सतत गुन्हेगारी कारवाई, वाळु चोरी व अन्य गुन्ह्यात अग्रेसर असणाऱ्या शहरातील पाच तर लक्ष्मीटाकळी (ता. पंढरपूर) येथील एकाला चार जिल्हातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये माजी कॉग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस नागेश गंगेकर यांचा चिरंजीवाचा सहभाग आहे.
प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी २९ आॅक्टोबर २०१८ रोजी हद्दपरीचे आदेश काढले आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाणे हद्दीतील महेश तानाजी शिंदे (वय २७, रा. इसबावी, ता. पंढरपूर), ऋषिकेश नवनाथ मेटकरी (वय २४, रा. दाळे गल्ली, पंढरपूर), विकी मधुकर मेटकरी (वय २४, रा. राऊत मळा, एम एस ई बी पाठीमागे पंढरपूर), सुरज उर्फ लाल्या बाबू गंगेकर (रा. अनिल नगर, पंढरपूर) हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहे. वरील चौघांना दोन वर्षाच्या कालावधीसाठी सोलापूर, सातारा, पुणे व सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आलेले आहे. तसेच विवेक नागेश गंगेकर (रा. जुनी पेठ, पंढरपूर) याला एक वर्षाच्या कालावधीसाठी सोलापूर सातारा, पुणे व सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आलेले आहे.
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील भैय्या उर्फ सुरज मनोहर जगताप (रा. जगदंबा नगर, लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) याला दोन वर्षाच्या कालावधीसाठी सोलापूर सातारा व सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून करण्यात आलेले आहे. आणखी पंधरा लोकांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम पंढरपूर विभागीय पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे यांच्याकडून सुरु आहे. यामुळे पुढच्या यादीत कोणा-कोणाची नावे समोर येणार यांचा धसका शहर व तालुक्यातील गुन्हेगारांनी घेतला आहे.