सोलापूर : महापालिका आणि लोकसभा निवडणुकीसह पक्षातील इतर कामांसाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सोलापुरात मागील काळात दीड कोटी रुपये पाठविले होते. इतर बाबतीतही त्यांना मदत करण्यात आली. तुम्हाला ही गोष्ट सांगितली जात नाही, असा मुद्दा सेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी नुकतेच नगरसेवकांच्या एका बैठकीत उपस्थित केला. या बैठकीनंतर शिवसेना नगरसेवकांत वादाला तोंड फुटले आहे.
शहर मध्य विधानसभेसाठी शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी कामाला लागले आहेत. जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सावंत आणि सहसमन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवले आहे. उमेदवारीवरुन सेनेत सुरुवातीला वाद झाला. यावर चर्चा घडवून आणण्यासाठी सावंत बंधूंनी शहरातील पदाधिकाºयांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप माने यांच्या प्रचार नियोजनासाठी बोलाविलेल्या एका बैठकीत प्रा. शिवाजी सावंत यांनी नगरसेवकांशी संवाद साधला.
महापालिका निवडणूक स्वत:च्या जीवावर लढलो म्हणणाºया लोकांना शिवसेना पक्षाने बरीच मदत केली. पण ही मदत ते लोकांना सांगत नाहीत. महापालिका निवडणुकीत प्रा. तानाजी सावंत यांनी उमेदवारांच्या खर्चासाठी, प्रचाराचे काम आणि नंतरच्या इतर कामांसाठी एक कोटी रुपये पाठविले होते. पण ही गोष्ट त्यांच्याकडून सांगितली जात नाही. त्यावर नगरसेवकांनी, ‘आम्हाला निवडणुकीत काहीच मदत मिळाली नाही. निवडणुकीनंतर काही नगरसेवकांना कोर्ट कचेºया कराव्या लागल्या. त्यासाठी सुध्दा पैसा मिळाला नाही’, असे उद्गार काढले.
लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून ४५ लाख रुपये पाठविण्यात आले होते. तुम्हाला किती मिळाले, असा प्रतिप्रश्न सावंत यांनी केला. त्यावर कुणी २० हजार तर कुणी २५ हजार असे उत्तर दिले. बुथ यंत्रणा भाजपकडून दिली जाणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. म्हणून आम्ही जास्त वाद घातला नाही, असेही शहरातील पदाधिकाºयांनी सांगितले.
या बैठकीनंतर शिवसेनेत संशयकल्लोळ आहे. पक्षाकडून आलेला पैसा नगरसेवक, प्रमुख पदाधिकाºयांपर्यंत पोहोचला नाही. मग तो कुठे गेला, असा प्रश्नही नगरसेवक उपस्थित करु लागले. पण एकदा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होऊन जाऊ द्या. त्यानंतर तत्कालीन पदाधिकाºयांना याबाबत विचारणा करु, अशी समजूत पदाधिकाºयांकडून काढण्यात आली. उध्दव ठाकरे यांच्या सभेनंतर या विषयावर पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे.
सावंत म्हणाले, अधिकचे नंतर बोलू..- दरम्यान, यासंदर्भात प्रा. शिवाजी सावंत यांच्याशी संपर्क केला. त्यांनी याबाबत अधिकचे नंतर बोलू. मी आता सभेसाठी जात आहे, असे सांगून फोन कट केला. सेनेचे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र अधिक भाष्य टाळले.