पंढरपूर : भक्तवत्सल विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दहा ते बारा तास दर्शन रांगेत थांबावे लागते. यामुळे वृद्ध, बालकांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी मंदिर समितीने स्कायवॉकचा पर्याय शोधला असून, यासाठी उस्मानाबाद जनता बँकेशी करारही झाला आहे. येत्या आठवड्यात प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. विठ्ठल- रूक्मिणी मंदिर समितीची बैठक अध्यक्ष अण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली, यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दर्शन मंडपापासून ते तुकाराम भवन समोरील व्यंकटेशद्वाराजवळ असलेल्या तरटी दरवाजापर्यंत हे स्कायवॉक साकारण्यात येणार आहे. यामुळे दर्शनाची गती वाढविण्याबरोबरच भाविकांना चालावे लागणार नाही. स्कायवॉकच्या माध्यमातून भाविक पुढे सरकत विठ्ठलाच्या चरणावर माथा टेकवणार आहेत. यासाठी ३0 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. मंदिर समितीच्या कामकाजात सुधारणा करण्याबरोबरच सहव्यवस्थापक, एक अकौंटंट, एक अन्न व औषध प्रशासन अधिकारी, एक पशुवैद्यकीय अधिकारी, एक सॅनिटरी इन्स्पेक्टर, राज्यात विखुरलेल्या विठ्ठलाच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी व ताब्यात घेण्यासाठी एक महसूल अधिकारी, एक वकील, एक सहायक अधिकारी यांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. मंदिर समितीमध्ये जमा होणारी देणगी, दागदागिने यांचा आढावा दर आठवड्याला घेण्यात येणार असून, गैरवर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नागपंचमी, गौरी पूजा, श्रावण मासातील कार्यक्रम परंपरेप्रमाणे होणार असून, श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली. गणेशोत्सव यंदा वेगळ्या पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रक्षाळ पूजेवेळी भक्तांचे नैवेद्य देवाला पोहोचविण्यासाठी गांभीर्याने विचार करण्याचा निर्णयही मंदिर समितीने घेतला. ----------------------------------------------------------अन्य समाजातील पुजारीविठ्ठल-रूक्मिणीच्या महापूजेसाठी दहा पुजाऱ्यांची निवड करण्यात आली असून, यामध्ये पाच ब्राह्मण, दोन गुरव, एक शिंपी, एक जंगम, एक कासार या समाजातील पुजाऱ्यांची निवड करण्यात आली आली आहे.आराखड्याला मान्यतासर्व्हे नं. ५९ मधील तीनशे खोल्यांच्या भक्तनिवासाच्या अंतिम आराखड्याला मान्यता दिली असून, त्याची निविदा चार ते पाच दिवसात प्रसिद्ध होणार असून, यासाठी ५१ कोटींची तरतूद आहे.
भाविकांसाठी पंढरीत स्कायवॉक
By admin | Published: July 23, 2014 12:49 AM