रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : मुंबईतील डोंगरी भागात १०० वर्षे जुनी असलेली केसरबाई इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर गजबजलेल्या पार्क चौकातील जिल्हा परिषदेच्या नेहरू वसतिगृहातील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसतिगृहाच्या तिसºया मजल्यावरील स्लॅब कोसळू लागला असून, यंदापासून तिसरा मजला बंदिस्त करण्यात आला आहे. तळमजल्यासह पहिल्या आणि दुसºया मजल्यातील इमारतीत राहणाºया विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत असल्याचे चित्र ‘लोकमत’च्या आॅन दि स्पॉट रिपोर्टिंग करताना चमूच्या कॅमेºयात कैद झाले.
बुधवारी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी ‘लोकमत’चमू वसतिगृहाच्या प्रवेशद्वारात पोहोचला. तेथील सुरक्षारक्षक नरेंद्र राजपूत यांनी आम्हाला ‘कुणाला भेटायचे’ म्हणून विचारले. त्यावर आम्ही इमारतीतील समस्यांचे कारण पुढे केले. तोही उत्साहाने ‘साहेब, तिसºया मजल्यावर जाऊन या. जाताना भेटा’ असे त्याचे उत्तर ऐकून चमू पुढे मार्गस्थ झाला. ए, बी, आणि सी या विभागात वसतिगृहाची तीन मजली इमारत वसली आहे. ज्या-त्या मजल्यांवरील खोल्यांना ए-१, ए-२, ए-३, बी-१, बी-२, बी-३ आणि सी-१, सी-२ आणि सी-३ यानुसार क्रमांक दिले आहेत. १२.२० वाजता तळमजला, दुसरा मजला चढल्यावर तिसºया मजल्यावर जाण्यासाठीचा प्रवेश बंद होता. शिपायाला विनंती केली तर त्याने तातडीने चावी आणून प्रवेशद्वार खुला करून दिला.
तिसºया मजल्यावरील १३२ ते १८९ क्रमांकापर्यंतच्या खोल्या विद्यार्थ्यांविनाच पाहावयास मिळाल्या. प्रत्येक खोलीतला स्लॅब निघालेला होता तर लोखंडी सळया चक्क नजरेत भरत होत्या. हे झाले खोल्यांमधील दर्शन. खोल्यांच्या बाहेरचा स्लॅब ढासळू लागल्याचेही चित्र चमूतील छायाचित्रकाराने आपल्या कॅमेºयात बंदिस्त केले. बहुतांश खोल्यांमधील वायरी जळालेल्या स्थितीत तर सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत दिसून आले. तिसºया मजल्यावरील आॅन दि स्पॉट रिपोर्टिंग करीत पुन्हा चमू १२ वाजून ४० मिनिटांनी पुन्हा दुसºया मजल्यावर दाखल झाला. तेथील काही शौचालयांना आणि बाथरुमना दारे नव्हती. काहींना दारे होती तर आतून कडी नसल्याचे विद्यार्थ्यांनी चमूला दाखवून दिले. ए-२६ या खोलीतील खिडकीत डोकावले असता पाठीमागे दारूच्या बाटल्या पडल्याचे दिसून आले. जाता-जाता म्हणजे १ वाजून ५ मिनिटांनी चमू तळमजल्यावरील शुद्ध पाणी यंत्रणा असलेल्या खोलीत पोहोचला. पाणी शुद्धीकरणाचे यंत्र बंद अवस्थेत होते. पाणी थंड करण्याची यंत्रणा मात्र सुस्थितीत असल्याचेही जाणवले. ‘लोकमत’चमू आल्याचे समजताच वसतिगृहात प्रवेश घेतलेले ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ‘चमू’समोर दाखल झाले. एकेकजण समस्यांचा पाढाच वाचू लागले. जेव्हा त्यांना कॅमेºयासमोर येण्यास सांगितले, तेव्हा ही मुलं थोडी दचकलीच. ‘साहेब, आम्हाला कशाला पुढे आणता. आम्ही शिकायला आलोय. कशाला आम्हाला संकटात टाकताय’ असे म्हणून अनेकांनी नाव न छापण्याच्या अन् फोटो न घेण्याच्या अटीवर ‘लोकमत’ चमूसमोर समस्यांचा जणू डोंगरच उभा केला.
पाण्याच्या २२ टाक्या हटवण्याचे आदेश- वसतिगृहात ३५० मुलांच्या प्रवेशाची क्षमता आहे. या मुलांसाठी तिसºया मजल्यावर पिण्याच्या पाण्याच्या २२ टाक्या आहेत. या टाक्यांच्या वजनामुळे तिसरा मजला ढासळू नये अथवा या टाक्यांमुळे इमारतीवर ताण येऊ नये म्हणून त्या हटवण्याचे आदेश देण्यात आल्याचे अधीक्षक सोमसिंग चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. इमारतीतील बाथरुममध्ये पाणी साचते. निचरा नसल्याने ते पाणी भिंतीतच मुरते. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण होत असल्याचे अनेक मुलांनी सांगितले.
तिसºया मजल्यावरील स्लॅब ढासळू लागला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे या मजल्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदापासून या मजल्यावरील सर्वच खोल्या बंद करण्यात आल्या आहेत. तळमजल्यासह पहिल्या आणि दुसºया मजल्यावरील खोल्यांची दुरुस्ती, वायरिंगचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.- सोमसिंग चव्हाण, अधीक्षक, जवाहरलाल नेहरु वसतिगृह.
आम्ही कसे राहतो, हे आम्हालाच ठाऊक. कोणी लक्ष देत नाही. एकूणच ग्रामीण भागात राहणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेचा संबंधित विभाग आणि अधिकाºयांनी वेळीच लक्ष दिले तर विद्यार्थ्यांची सुरक्षा टिकणार आहे.- सौरभ राऊत,विद्यार्थी.
अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. सध्या तिसरा मजला बंद ठेवण्यात आला आहे. तिसºया मजल्यावर कोणी जाणार नाहीत, याची दक्षता घेतो. ना समाधानकारक पगार ना सुटी असे असतानाही इमाने इतबारे नोकरी करीत असताना मुलांच्या सुरक्षेचाच अधिक विचार करतो.- नरेंद्र राजपूत, सुरक्षा रक्षक