सोलापूर : सतत वाढत जाणाऱ्या तापमानात शनिवार ६ एप्रिल रोजी किंचित घट झाली. शुक्रवारच्या तुलनेने शनिवारी ०.७ अंशाने तापमान घटले. तापमानात घट झाली असली तरी धग मात्र कायम आहे. हवामान विभागाने रविवारपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.
सोलापूरच्या तापमानात शुक्रवार ५ एप्रिल रोजी विक्रमी वाढ झाली. शुक्रवारी तापमान हे ४३.१ अंश सेल्सिअस इतके होते. यंदाच्या वर्षीच्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर एकाच दिवसात ०.७ अंश सेल्सिअसने तापमानाच घट झाली. ही घट किंचित असल्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होताना दिसत आहे. तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा बसत आहे . त्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे उन्हात काही काळ जरी बाहेर पडल्यास डोकेदुखी सारख्या समस्यांना सोलापूरकरांना तोंड द्यावे लागत आहे. वाढते तापमान पाहून शहरातील अनेक दुकानात एसी, कूलर, पंख्यांची मागणी वाढत आहे. तर शहरातील भाजी मंडईमधून कलिंगड, टरबूज आदी फळे खरेदी केली जात आहेत. शहरातील सर्व मंडईमध्ये फळे घेणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे. ७ ते ११ एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस ?सोलापूरचे तापमान सध्या वाढत असले तरी पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ७ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. या दरम्यान वीजेचा कडकडाट व अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अवकाळी पाऊस आल्यास तापमानात घट होऊ शकते. उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.