सोलापूर : कंबर तलावातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी आयआयटी चेन्नईच्या वतीने तलावात किती गाळ आहे याची मोजणी सेन्सरमार्फत करण्यात आली. तलावांमध्ये किती गाळ आहे याचा अहवाल ते महापालिकेला सादर करणार आहेत.
कंबर तलावातील गाळ काढण्यासाठी तामिळनाडू येथील कंपनीला काम देण्यात आले आहे. त्याआधी तलावामध्ये किती गाळ आहे याची तपासणी करण्यात आली. आयआयटी चेन्नईच्या पथकाने मागील आठवड्यामध्ये तलावातील परिसराचे निरीक्षण केले. जीपीएसच्या माध्यमातून सेन्सरच्या मदतीने त्यांनी पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचे किरण (रेज) सोडले. त्यावरुन तलावात किती गाळ आहे, याची माहिती त्यांना मिळाली. या आठवड्यात गाळ किती आहे, याचा अहवाल महापालिकेला देण्यात येणार आहे.
तलावात आधी किती गाळ होता, किती प्रमाणात काढला हे आयआयटी चेन्नई तपासणार आहे. यासाठी आयआयटी चेन्नईचे पथक पुन्हा सोलापुरात येणार आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार तामिळनाडू येथील कंपनीला गाळ काढण्याचा मोबदला दिला जाणार आहे.
खाणीतून पाणी जाण्यासाठी चर खोदली
सध्या तलावामध्ये गाळ काढण्यासाठी मोठी बोट सोडण्यात आली आहे. त्यातून पाईप काढून तो शेजारच्या खाणींमध्ये सोडण्यात आला आहे. या खाणीमध्ये तलावातील गाळ एकत्र केला जाणार आहे. गाळासोबत तलावातील पाणीही येईल. हे पाणी पुन्हा तळ्यात जाण्यासाठी गुरुवार तीन डिसेंबर रोजी खाणीतून चर खोदण्यात आली.