लोकमत न्यूज नेटवर्क, पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला भाविकांकडून अर्पण केलेले लहान-मोठे दागिने वितळवून मोठा दागिना तयार करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या वतीने सरकारच्या विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे छोटे-छोटे दागिने मिळून जवळपास २८ किलो सोने अन् ९५० किलो चांदी जमा झाली आहे. वर्षाकाठी विठ्ठलाच्या दर्शनाला एक कोटीहून अधिक भाविक येतात. अनेक भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला छोटे-मोठे सोन्याचे व चांदीचे दागिने अर्पण करतात.
दागिने छोटे असल्यामुळे देवाला परिधान करता येत नाहीत. त्यामुळे त्याचा मोठा दागिना तयार करण्याची परवानगी मिळावी, यासाठी विधि व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्याप मंजुरी मिळाली नाही, असेही औसेकर यांनी सांगितले.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार आहे. यामुळे विठ्ठलाच्या पदस्पर्श व मुखदर्शन, अशा दोन रांगा राहणार आहेत. दर्शन रांगेत कोणताही बदल करण्यात आला नाही.- ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती