सोलापूर /पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज ५० हजारांहून अधिक भाविक पंढरीत येतात. या भाविकांकडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला लहान-मोठे दागिने अर्पण केले जातात. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे छोटे-छोटे दागिने मिळून जवळपास २८ किलो सोने अन् ९५० किलो चांदी जमा झाली आहे. हे दागिने वितळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विधि व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळाली नसल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रांसह महिन्याच्या एकादशीदिवशी भाविकांची पंढरीत गर्दी असते. वर्षाकाठी विठ्ठलाच्या दर्शनाला एक कोटीहून अधिक भाविक येतात. आलेल्या अनेक भाविकांकडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला छोटे-मोठे सोन्याचे व चांदीचे दागिने अर्पण केले जातात.
हे दागिने श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेला परिधान करता येत नाहीत. त्यामुळे मंदिर समितीला अडचण निर्माण होत आहे. यामुळे हे दागिने वितळवून त्याचा मोठा दागिना तयार करण्याची परवानगी मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विधि व न्याय विभागाकडे मंदिर समितीने प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्याप त्यास मंजुरी मिळाली नाही, अशी माहिती सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
सध्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू आहे. यामुळे भाविकांची संख्या कमी झाली आहे. आषाढी यात्रा १७ जुलै रोजी साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर २८ जुलै रोजी श्रीसंत तुकाराम महाराज व २९ जुलै रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यात येणार आहे.