सोलापूर: एकीकडे सूर्य आग ओकू लागलेला त्यातच दुपारी सव्वादोनच्या सुमारास महापालिकेच्या झोन क्र. ६ कार्यालयाजवळ ठेवण्यात आलेल्या स्मार्ट सिटी केबल पाईपला अचानक आग लागली अन् दूरवरुन धुराचे लोट पसरले अग्निशामक दलाने तातडीने दखल घेऊन घटनास्थळी गाड्या पाठवल्या. सहा गाड्या पाणी आणि १० ड्रम फोमचा मारा केल्यानं आग आटोक्यात आली. सुदैवाने मन्युष्य हानी झाली नाही.
महापालिकेच्या स्मार्ट सिटी यंत्रणेमार्फत शहरात वापरण्यासाठी केबल पाईपचे बंडल झोन क्र. ६ च्या परिसरात ठेवण्यात आलेले होते. दुपारच्यावेळी पालापाचोळ्यावर ठिणगी पडून ही आग लागली असावी असे सांगण्यात येत आहे.
प्लास्टिकच्या पाईपचे बंडल असल्याने आग वेगाने भडकडली. एक किलोमीटर अंतरावर धुराचे लोट पसरल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन खातरजमा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने अग्निशामक दलाचे पथक होम मैदानावर होते. धुराचे लोट पाहून अधीक्षक केदार आवटे यांनी तातडीने अगोदर एक गाडी घटनास्थळी पाठवली. त्या पाठोपाठ सहा गाड्या पाठवण्यात आले.