सोलापूर : सोलापूर शहरात छत्रपती संभाजी महाराज चौक येथे प्रवेश केल्यानंतर मोठमोठ्या खड्ड्यांनी स्वागत होते. शहरातील मुख्य रस्ता, अशी ओळख असलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने शहरवासीयांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट सिटीने केलेल्या ड्रेनेजलाइनच्या कामामुळे आणि पावसाने रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, हा रस्ता सध्या रेसिंग ट्रॅक बनला आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे लहान-मोठे अपघात, पाठदु:खी, कंबरदुखी अशा आजारांना आमंत्रण मिळत आहे. पाऊस आल्यानंतर तर या रस्त्यावरील खड्ड्यांत मोठे पाणी साचत असल्याने या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त होत असल्याने शहरवासीयांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते सात रस्ता हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग यांच्या आधिपत्याखाली येत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी हा रस्ता तयार केलेला आहे.
शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मुख्य रस्ता असून, या ठिकाणी मुंबई-पुणे, हैदराबाद, कर्नाटक या मार्गावरील वाहनांची चोवीस तास वाहतूक सुरू असते. सध्या या रस्त्यावरील डांबरी थर काही ठिकाणी पूर्णपणे निघून गेला आहे, तर काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्यापेक्षा अधिक उंचावर आहेत, म्हणून या रस्त्यास रेसिंग ट्रॅकचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होत आहे.
-----
कोण करणार दुरुस्ती
रस्त्याचा रेसिंग ट्रॅक झाला असतानाही संबंधित विभाग मात्र या रस्त्यावर, डांबर, मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचेदेखील सौजन्य दाखवत नाही. शहरातील मुख्य रस्त्यांच्या या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या या गलथान कारभाराबाबत नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शहरातील प्रवेशद्वार ते छत्रपती शिवाजी चौक या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्वधिक त्रास प्रवासी आणि वाहनचालकांना होत आहे. गाड्यांचे सुटे भाग लवकर खराब होत आहेत, कराच्या रूपाने आरटीओला महसूल देऊनही खराब रस्त्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
-महिपती पवार, राष्ट्रवादी रिक्षा सेल शहराध्यक्ष
---