आप्पासाहेब पाटील
सोलापूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विविध क्षेत्रात उत्पादन करणाºया दहा कंपन्या सोलापुरात येण्यास सज्ज असून, येथे त्यांना पुरेशी जागा आणि सहकार्याची अपेक्षा आहे, अशी माहिती स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी ‘लोकमत’ ला दिली.
वेक अप सोलापूर फाउंडेशनने सोलापुरात रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी राज्यातील विविध कंपन्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक मंडळांची भेट घेऊन सोलापूरची बलस्थानं सांगितली़ यासंदर्भात माहिती देताना ‘वेक अप’ सोलापूर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद भोसले म्हणाले की, सोलापुरात उद्योगवाढीसाठी सर्वार्थाने पोषक वातावरण असून सुमारे दहा राज्यांना जोडणारी रेल्वे सेवा उपलब्ध आहे़ शिवाय सुसज्ज विमानतळ आहे़ महानगरांना जोडणारी विमानसेवा ‘उडान’ सुरू होणे दृष्टिक्षेपात आहे़ त्यामुळे सोलापुरात कोणताही नवीन उद्योग सुरू करणे सोयीचे व सुलभ जाणार आहे़ शिवाय या शहरात महानगरांच्या तुलनेने कमी किमतीची शेकडो एकर जागा उपलब्ध आहे.
शहरात साधारणत : १३ इंजिनिअरिंग महाविद्यालये असून ३०० हून अधिक विद्यार्थी दरवर्षी विविध अभियांत्रिकी शाखांची पदवी घेऊन बाहेर पडतात़ त्यामुळे उद्योगासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळही उपलब्ध आहे़ या सर्व बाबी आम्ही राज्यातील उद्योजकांसमोर मांडल्या़ त्यामुळे सोलापूरची बलस्थानं त्यांच्या ध्यानात आली़ यामुळे या उद्योजकांनी शहरात उद्योग सुरू करण्याचा सकारात्मक विचार सुरू केला आहे़ आम्ही भेटलेल्या उद्योजकांपैकी दहा कंपन्यांच्या अध्यक्षांनी भेटण्याची तयारी असल्याचे सांगून जागेचीही विचारणा केली आहे असे भोसले म्हणाले़
सोलापूरचं ब्रँडिंग करणारं सोलापूर सोशल फाउंडेशन...
- - सोलापूर शहर व जिल्ह्याला राज्यात आणि देशात ओळख मिळावी यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापुरी उत्पादनांना सोलापूरच्या बाहेर मार्केट देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ सोलापूर शहर व जिल्ह्यातील चाळीस लाख लोकांना सोबत घेऊन हे फाउंडेशन कार्यरत राहणार आहे.
- - सोलापूर शहर व जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन, सोलापुरी चादरी, कडक भाकरी व शेंगा चटणी यासह सोलापूरच्या इतर उत्पादनांना या फाउंडेशनच्या माध्यमातून बाजारपेठ देण्याचा प्रयत्न सुरू आहे़ त्यादृष्टीने पुण्यात सोलापूर फेस्ट तर बंगळुरु येथे वस्त्रोद्योगासाठीचे प्रदर्शन भरविले होते़ एकप्रकारे सोलापूरचे ब्रँडिंग करण्याचे काम यापुढे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येईल अशी माहिती सहकार,पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
कृषी पर्यटन केंद्राचे मॉडेल वानप्रस्थ कृषी पर्यटन केंद्र
- - शेती करीत शेतकºयांनी जोड व्यवसाय सुरू करावा यासाठी वानप्रस्थ कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे़ वानप्रस्थने आतापर्यंत देशात ३०० हून अधिक सेंटर्स उभे केलेले आहेत. या सेंटरमधून शेतकºयांना जोड व्यवसाय सुरू करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
- - याशिवाय परदेशी पर्यटकांना सोलापूरकडे आकर्षित करण्यासाठी नवनवे उपक्रम राबविले जातात़ हुरडा खाण्यासाठी मागील चार ते पाच वर्षांपासून परदेशी पर्यटक सोलापूरला येतात़ मागील आठ वर्षांपासून वानप्रस्थच्या माध्यमातून सोलापूरचे नाव उज्ज्वल करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती वानप्रस्थच्या प्रमुखा सोनाली जाधव यांनी दिली़