विलास जळकोटकरसोलापूर: विविधांगी गुण वैशिष्ट्यानं नटलेल्या सोलापूरनं आपला पारंपरिक बाज कायम ठेवताना नवे बदल स्वीकारले आहेत. वैद्यकीय क्षेत्रानंही महाराष्टÑात उपलब्ध तंत्रज्ञान सोलापुरात कार्यान्वित केलं आहे. दुर्धर अशा आजारानं त्रस्त असणारा रुग्णांचा पुण्या-मुंबई, बंगळुरुसारख्या शहराकडं जाणारा ओढा आता कमी झालाय. आपल्याच शहरात ही सुविधा मिळू लागली आहे. होय, वैद्यकीय क्षेत्र प्रगत झालंय, अन् नवनवीन तंत्र स्वीकारतेय, स्मार्ट होतेय, अशा भावना वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
शहरात मिळणाºया पायाभूत सुविधांमुळे सोलापूर शहराशिवाय आंध्र, कर्नाटक, मराठवाड्यातील रुग्णांची संख्या मोठ्या संख्येनं वाढते आहे. अन्य मेट्रो शहरामध्ये असणारी उपचारपद्धती महागडी असल्यानं आणि आर्थिक व मानसिक त्रास जवळच्या शहरातच मिळू लागल्याची भावना रुग्णांमध्ये वाढीस लागली आहे, अशा प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांशिवाय रुग्णांमधूनही व्यक्त करण्यात आली आहे. हृदयाच्या विविध शस्त्रक्रिया, मेंदूशी संबंधित तंत्रज्ञान इथं सुरू झालं आहे. अन्य शहरामध्ये रुग्णांच्या उपचाराच्या खर्चाशिवाय इतर होणारा खर्चही अन्य शहरापेक्षा कमी असल्याचं रुग्णांचं म्हणणं आहे.
सुपरस्पेशालिटीपासून सबकुछ सोलापुरात - सोलापूर शहर अन्य वैशिष्ट्याशिवाय वैद्यकीय क्षेत्रानंही गेल्या २५ वर्षांत आपला ठसा उमटवला आहे. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अनेक खासगी रुग्णालये सुपरस्पेशालिटी सेवा देताहेत. शासकीय रुग्णालयही यात मागे नाही. इथंही शासनाबरोबरच लोकसहभागातून प्रसूती कक्ष, डायलिसीस सेंटर, नवजात शिशू कक्षाद्वारे सेवा दिली जातेय. शासकीय रुग्णालयातही सुपरस्पेशालिटी सेवा देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. हा सारा भार स्मार्ट वैद्यकीय क्षेत्रानं अंगिकारला आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी व्यक्त केली.
सोलापूरचं वैद्यकीय क्षेत्र प्रगत तंत्रज्ञानानं समृद्ध होत आहे. मेट्रो शहरामध्ये होणारे उपचार आता सोलापुरात आणि तेही माफक दरामध्ये उपलब्ध होताहेत. आधुनिक सामग्री इथं कार्यान्वित आहे. हाडाशी संबंधित उपचार इथं सहजसुलभ शक्य झाले आहेत. हे स्मार्ट वैद्यकीय क्षेत्राचंच लक्षण म्हणावं लागेल.- प्रा. डॉ. सुनील हंद्राळमठ, हस्तीरोग तज्ज्ञ
पूर्वी बायपास शस्त्रक्रिया म्हटलं की, रुग्ण पुणे, मुंबईकडे, बंगळुरुकडे जायचे; मात्र आता ९२ टक्के शस्त्रक्रिया सोलापुरात होत आहेत. तो ओढा कमी झालाय. हृदयाच्या नाजूक शस्त्रक्रिया इथं विनासायास होताहेत. गेल्या दोन महिन्यात मी अशा प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया केल्या. मॉड्युलर आॅपरेशन थिएटर उपलब्ध आहेत. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कार्यान्वित झाले आहे. शिवाय उपचारपद्धतीचा मोठा खर्च सेवाभावी, धर्मादाय संस्थांकडून उपलब्ध होताहेत. पैशासाठी इथं उपचाराचा अधिकार नाकारत नाही. आपल्याकडे प्रोफेशनली पाहिलं जात नाही. हा वैद्यकीय क्षेत्रातील स्मार्ट बदल म्हणावा लागेल.- डॉ. विजय अंधारे, हृदयशल्यविशारद
आज सोलापूर सिटी जशी स्मार्ट होत आहे तसंच वैद्यकीय क्षेत्रातही स्मार्टनेसपणा आलेला आहे. मेंदू आणि मज्जारज्जू संबंधित निदान आणि उपचार यातही स्मार्टनेसपणा आलेला आहे. या आजाराचं निदान करण्यासाठी अत्याधुनिक अशा सिटी स्कॅन, १.५ टेस्ट एमआरआय, डिजिटल सबस्टायक्शन अँजीओग्रॉफी अशा मशिनरी सोलापुरात उपलब्ध आहेत. अचूक निदान झाल्यास दुर्बिणीद्वारे मेंदू आणि मज्जारज्जू याचीही शस्त्रक्रिया केली जाते. मेंदूतील रक्ताची गाठ किंवा ब्रेनट्यूमर अथवा मान किंवा कमरेखालील गादी सरकल्यास असे आॅपरेशन दुर्बिणीद्वारे केले जातात. हे स्मार्ट सोलापूरच्या दृष्टीनं भूषणावह बाब म्हणावी लागेल.- डॉ. सचिन बलदवा, न्यूरो स्पॅन सर्जन