सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून महापालिकेच्या ५९ शाळाडिजिटल करण्याचा प्रस्ताव आहे.
आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पदभार घेतल्यापासून एकेक विभाग सुधारण्यावर भर दिला आहे. पाणीपुरवठा सुधारण्याबरोबर आरोग्य विभागाकडे त्यांनी लक्ष दिले. त्यामुळे महापालिकेच्या दवाखान्यांची गुणवत्ता सुधारली. त्यानंतर महापालिकेच्या मंडई विभागाकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
मंडई ओस व रस्त्यावर विक्रेत्यांची गर्दी असे असलेले चित्र बदलण्यासाठी आयुक्तांनी पाऊल उचलले आहे. यातूनच चिप्पा मंडई, चैतन्य मंडई, महात्मा फुले मंडई सुधारण्यावर भर दिला आहे. यापुढे जाऊन लक्ष्मी मंडई स्मार्ट करण्यासाठी साडेआठ कोटींचा प्रकल्प तयार केला आहे. त्यानंतर आता आयुक्त डॉ. ढाकणे यांनी महापालिकेच्या शाळा सुधारण्यांकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
सध्या लष्कर येथील कॅम्प शाळेत सुरू करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यमाची शाळा गुणवत्तेची करण्यावर भर दिला जात आहे. या शाळेसाठी गेल्या आठवड्यात ६ शिक्षकांची मानधनावर भरती करण्यात आली आहे. लवकरच आता इतर शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हातात टॅब, संगणक व इतर प्रगत शैक्षणिक साधनांची उपलब्धता केली जाणार आहे. उद्योजकांनी काही शाळांना एलईडी स्क्रीन दिले आहेत.
डिजिटलवर भर- शहरात महापालिकेच्या ५९ शाळा आहेत. या शाळांमध्ये मराठीबरोबरच तेलुगू, कन्नड व उर्दू माध्यमांचेही शिक्षण दिले जाते. अलीकडे शहरात मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा सुरू झाल्यामुळे महापालिकांच्या शाळांचा पट घसरला. कित्येक शाळा बंद पडल्या. त्यामुळे हीच स्थिती राहिली तर भविष्यात उर्वरित शाळांचे भवितव्य धोक्यात येईल. ही गरज ओळखून आयुक्तांनी सर्व शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून पहिल्या टप्प्यात काही शाळा सुधारण्यांवर भर दिला जाणार आहे.
आयुक्तांनी डिजिटल स्कूल तयार करण्यासंदर्भात सूचना केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २0 शाळांचे प्रस्ताव तयार केले आहेत. शाळांमध्ये चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करून गुणवत्ता वाढीचे विविध प्रयोग करण्यात येत आहेत. - सुधा साळुंके, प्रशासनाधिकारी