सोलापूर : महापालिकेच्या नव्या प्रभाग समित्या स्थापन करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. तत्पूर्वी विजापूर रोडवरील ‘पनाश’ इमारतीत नवे स्मार्ट झोन कार्यालय साकारले जात आहे. समावेश आरक्षणाच्या माध्यमातून या इमारतीचा विकासक पाच हजार ६०० स्क्वेअर फुटाच्या जागेत महापालिकेला मोफत बांधकाम करुन देत आहे.
विजापूर रोडवरील ‘पनाश’ इमारतीच्या जागेवर डिस्ट्रिक्ट सेंटर आणि मार्केटचे आरक्षण होते. समावेशक आरक्षणे विकसित करण्याच्या नियमानुसार अमित खेपडे यांना ही जागा विकसित करण्याची परवानगी देण्यात आली. ही परवानगी देताना या इमारतीतील पाच हजार ६०० स्क्वेअर फुटाचे बांधकाम महापालिकेला देणे अपेक्षित होते. परंतु, बिल्डरने मुदतीत बांधकाम पूर्ण केले नाही. त्याबद्दल ग्राहकांच्या तक्रारी सुरू होत्या. शिवाय महापालिकेला जागाही दिली नाही. त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी या इमारतीचा बांधकाम परवाना रद्द करण्याची नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते.
महापालिकेने नोटीस बजावल्यानंतर बिल्डरने तत्काळ महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात धाव घेतली. करारानुसार इमारतीतील पाच हजार स्क्वेअर फूट जागा विकसित करून महापालिकेला देण्याची तयारी दर्शविली. महापालिकेने पुन्हा कारवाई थांबविली. मनपाचे नगर अभियंता संदीप कारंजे आणि सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली या इमारतीतील जागेत झोन कार्यालयासाठी इंटेरियरचे काम करून घेतले जात आहे.
या कार्यालयात विभागीय अधिकाºयांसोबत सहायक अभियंत्यांसाठी स्वतंत्र केबिन असेल. प्रभाग समिती सदस्यांच्या बैठकीसाठी स्वतंत्र सभागृह असेल. शिवाय सभापतींसाठी स्वतंत्र केबिन असेल. विद्युत आणि सफाई विभागातील अधिकाºयांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा असेल. कर संकलन केंद्रासोबतच या ठिकाणी एक दवाखाना सुरू करण्याचे नियोजन आहे. नागरिकांना बसण्यासाठी जागा आणि स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतीकडे येण्यासाठी एक रस्ताही तयार केला जात आहे. शिवाय लवकरच झाडेही लावण्यात येणार असल्याचे सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले.