करमाळा : मोलमजुरी करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. पूजा जाधव (वय ३२, रा. केम, ता. करमाळा) असे सर्प दंशाने मरण पावलेल्या महिलेचे नाव असून, गुरुवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना घडली.
पूजा जाधव सकाळी अंघोळ आटोपून डोक्याला लावण्यासाठी खोबरेल तेलाची बाटली शोधत होत्या. कोपटातील फळीवर ही बाटली घ्यायला गेल्या असता सर्पाने हाताला दंश केला. तिला ताबडतोब केम येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष पालखे यांनी प्राथमिक उपचार करून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात निघाले. रुग्णाला करमाळा येथे दाखल करताच डॉक्टरांनी पूजाला मृत जाहीर केले.
--
मुले झाली पोरकी...
पूजा यांची आर्थिक स्थिती अत्यंत गरिबीची असून, त्या गावात धुणे-भांडी करून उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दोन दीर आहेत.
---
आरोग्य केंद्र आहे, पण साधनांची वानवा
केम हे तालुक्यात एका टोकाला वसलेले गाव आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावर उपचार केममध्येच झाले पाहिजेत. त्यामुळे सर्पदंशावर उपचार करण्यासाठी ज्या उपकरणांची व औषधांची गरज आहे ते केमच्या आरोग्य केंद्रात उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केम येथील अनिल तळेकर, आशा वर्कर सुशीला जाधव यांनी केली आहे.
---
२९ पूजा जाधव