सोलापूर : जुनी पोलीस लाइन येथे एका घरातील वॉशरूमच्या जाळीत नाग अडकला होता. जाळीतून नाग निघत नसल्याने जाळीसकट नागाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर नागाची सुटका करण्यात आली.
मेनुद्दीन शेख हे रात्री ११ वाजता वॉशरूममध्ये गेले असता त्यांना एक साप दिसून आला. सापाने मैनुद्दीन यांची हालचाल पाहून पळायला सुरुवात केली; पण त्याला पळून जाण्यास जागा मिळत नसल्याने त्या नागाने वॉशरूमच्या जाळीतून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात नाग तो मधेच अडकला. मैनुद्दीन यांनी सर्पमित्र चव्हाण यांना घटनेची माहिती दिली. चव्हाण यांनी जाळीसाहित नागास नॅचरल ब्लू कोब्राचे दीपक इंगळे यांच्याकडे आणले. दीपक इंगळे यांच्या प्रयत्नाला यश न आल्याने त्यांनी साप हा सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांच्याकडे पाठविला. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सर्पमित्र महेश पाटील, देवानंद सुरवसे, चव्हाण यांचे योगदान लाभले. या नागाची प्राथमिक तपासणी करून त्याला त्वरित त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
पाऊण तासाचा थरार
नागाने भक्ष गिळल्याने त्याला पुढे सरकताना पोटातील तेच भक्ष अडथळा बनले होते. हे लक्षात घेऊन राहुल शिंदे यांनी सापाच्या शेपटीला पकडून साप जेथे अडकला आहे, तेथून हळूहळू त्यास मागे ओढायला सुरुवात केली आणि समोरून त्यास डिवचले. समोरून डिवचल्याने नागाने सुरुवातीस प्रतिकार केला; परंतु काही वेळाने नाग स्वतःहून हळूहळू मागे सरकू लागला. जवळपास पाऊण तासाच्या थरारानंतर या नागाची सुखरूपपणे जाळीतून मुक्तता करण्यात आली.