सोलापूर : होटगी रोड परिसरात एक विषारी मण्यार जातीचा साप आढळला. त्याच्या नाकातोंडात रॉकेल गेल्याने बेशुद्ध होता. नेचर कॉन्झरवेशन सर्कलच्या सर्पमित्रांनी त्याला शॅम्पूने आंघोळ घातली. तरी तो शुद्धीवर न आल्याने एका नळीने त्याला कृत्रिम श्वास देऊन जीवनदान देण्यात आले.
विमानतळाला लागून असलेल्या घरात भक्ष्याच्या शोधात आलेला एक साप आढळला. तेथील नागरिकांनी याची कल्पना सर्पमित्रांना दिली. काही वेळात सर्पमित्र पोहोचल्यानंतर तो साप विषारी मण्यार जातीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या नाकातोंडात रॉकेल गेल्याने साप निपचित पडला होता. त्याच्या अंगावरही रॉकेल सांडले होते. हा साप रात्रीत फिरणारा असून उंदराच्या शोधात त्याच्या बिळातून तो बाहेर आला असल्याचा अंदाज सर्पमित्रांनी वर्तविला.
साप शुद्धीवर येत नसल्याचे पाहून भरत छेडा यांनी सापाला शॅम्पूने आंघोळ घातली. यामुळे त्याच्या अंगावर असलेले रॉकेल निघून गेले; मात्र तरीही तो शुद्धीवर आला नाही. त्याच्या नाका-तोंडात रॉकेल गेल्याने श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. हे ओळखून एका छोट्या पाईपच्या साह्याने सापाला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला. काहीवेळाने साप हालचाल करू लागला. त्याला एका बरणीत ठेवण्यात आले. या बचाव अभियानाला दीड तासाचा वेळ लागला.
सापाला निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यास निघाले असता रस्त्यात एक मेलेला साप दिसला. या सापालाही बरणीत टाकण्यात आले. नुकताच शुद्धीवर येत असलेल्या मण्यार सापाने तो मेलाला साप खाऊन आपली भूक भागविली. काही वेळाने बचाव केलेल्या सापाला त्याच्या नैसर्गिक आवारात सोडून देण्यात आले.
प्रशिक्षणाविना सापाला हाताळू नका
- - मण्यार साप हा विषारी असतो. तो चावल्यास माणसाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. मजरेवाडी परिसरात बेशुद्ध असलेल्या सापाला आंघोळ घालून त्यास कृत्रिम श्वास देण्यात आला. त्यामुळे त्याला जीवनदान मिळाले. या पद्धतीने उपचार करणे हे प्रशिक्षणाशिवाय शक्य नाही. ज्याला याबाबतची माहिती नाही.
- - पुरेसे प्रशिक्षण घेतले नाही त्यांनी असा प्रयोग करू नये. साप आढळल्यास प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन नेचर कॉन्झरवेशन सर्कलतर्फे करण्यात आले आहे.
- - साप हा भिंतीला चिकटून सरपटत जात असतो. त्यामुळे नागरिकांनी रात्री भिंतीपासून दूर झोपावे. शक्यतो पलंग किंवा जमिनीपासून वर असणाºया कट्ट्यावर झोपावे, असे आवाहन करण्यात आले.