सोलापूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी काढण्यात आलेल्या विशेष भरतीत परिचर अर्थात शिपाई पदाच्या परीक्षेत एका उमेदवाराने चक्क शंभरपैकी शंभर गुण घेतले आहेत.
सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे विविध विभागात रिक्त असलेल्या १६ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. या पदासाठी २७१३ जणांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २६६३ जणांनी परीक्षा दिली. आरोग्य विभागाकडील परिचरची दोन पदे आहेत. यासाठी ६२२ जणांनी परीक्षा दिली. यात २१७ क्रमांकावरील उमेदवाराने शंभर पैकी शंभर गुण घेतले. त्याखालोखाल ९८ चा एक, ९६ चे दोन तर ९४ गुण घेतलेले तीन उमेदवार आहेत. आरोग्य सेविकाच्या पाच जागा आहेत.
यासाठी १७२ जणांनी परीक्षा दिली. त्यामध्ये प्रथम १३८ व द्वितीय १३० असे गुण मिळाले आहेत. आरोग्यसेवक ४० टक्के चार पदे असून यासाठी १४२७ जणांनी परीक्षा दिली. यामध्ये एका उमेदवाराने १५४ गुण घेतले आहेत. कंत्राटी ग्रामसेवकांसाठी ४ पदे असून, यासाठी ४४१ जणांनी परीक्षा दिली. यामध्ये १८२ गुण घेऊन प्रथम व त्याखालोखाल १७०, १६६ गुण घेतलेले उमेदवार आहेत. ही परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडली व आलेल्या उमेदवारांना चांगले गुण पडल्याने हुशार लोकांची निवड होणार असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी समाधान व्यक्त केले.
शिपाई पदासाठी शंभरपैकी शंभर मार्क घेतलेल्या उमेदवाराचे कौतुक करून प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांच्या पथकाने व्यवस्थित कामकाज केल्याचे त्यांनी सांगितले. उत्तरपत्रिका व निकालपत्रकावर फक्त क्रमांक नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे भरतीबाबत एकही तक्रार आलेली नाही, असे वायचळ यांनी सांगितले.