विठ्ठल खेळगी
सोलापूर : बदलत्या हवामानामुळे यंदा दिवाळीनंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रात कांद्याची लागवड वाढली, त्याप्रमाणेच आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूतही कांदा वाढल्याने सोलापुरी कांद्याला कोणीच विचारेना. त्यामुळे दर पडला. आता जोपर्यंत आवक थांबत नाही, तोपर्यंत दर वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे यंदा कांदा पीक जोमात असून, शेतकरी मात्र कोमात गेलेला आहे.
सोलापूरचे कांदा मार्केट राज्यात प्रसिद्ध आहे. लासलगावपेक्षाही सोलापूरमध्ये कांद्याची आवक अधिक असते. यंदाही मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक आहे. यंदा ऑगस्टपासून वाढलेली आवक अद्यापही सुरूच आहे. आजही सरासरी ५०० ट्रक कांद्याची आवक आहे. यंदा सततच्या पावसामुळे जूनमध्ये लागवड केलेला कांदा वाया गेला. शिवाय परतीच्या पावसामुळे सर्वत्र मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली. तो कांदा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात आला. जानेवारी महिन्यात संक्रांतीनंतर सरासरी ७०० ट्रक कांद्याची आवक होती. तेव्हा दर स्थिर राहिला. सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. त्यामुळे कांद्याची आवक वाढत राहिली. जानेवारी महिन्यातही दर स्थिर होता. फेब्रुवारी महिन्यात अचानकपणे दर पडला. १५०० रुपयांवरून दर थेट ५०० रुपयांवर आला. चांगल्या प्रतीच्या कांद्यालाही भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे.एकरी २०० पिशव्या कांदापिकांसाठी पोषक वातावरण असल्याने सगळीकडील कांदा चांगल्या दर्जाचा राहिला. आपल्याकडे एकरी सरासरी शंभर पिशव्या कांदा निघायचा. यंदा मात्र १५० ते २०० पिशव्या कांदा एकरी निघत असल्याने उत्पादन वाढले. त्यात रासायनिक खतांमुळे कांद्याला चकाकी आली. मात्र, दरच पडल्याने चांगला कांदा आता शेतातच पडून राहिला आहे.परकीय चलनाचा तुडवडाभारताच्या शेजारील पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या तीन देशांत परकीय चलनाचा तुडवडा आहे. त्यामुळे भारतातील कोणत्याची मालाला मागणी नाही. त्यामुळे कांदा निर्यात होत नसल्यामुळेही दरावर परिणाम झालेला आहे. जोपर्यंत निर्यात वाढत नाही, तोपर्यंत परिस्थिती सुधारणे शक्य नाही.आपल्याकडे यंदा फुरसंगी कांद्याची लागवड अधिक आहे. तो माल चांगलाही येत आहे. मात्र, दर नाही. सध्या सोलापूर मार्केटमध्ये पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतून आवक वाढत आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील शेतकरी कांदा ठेवून विकतात.-बसवराज इटकळे, संचालक