शीर्षक वाचल्यावर तुम्हाला वाटलं असावं की ही आजची गरज आहे. खूपवेळा असं होतं की पालक जाणते-अजाणतेपणी लहान मुलांच्या हातात स्मार्ट फोन देऊन टाकतात आणि गेम्स खेळ असा सल्ला देखील त्यास देतात, मग या गेम्स जरी शैक्षणिक असल्या तरी त्या खेळण्यासाठी स्मार्ट फोनचाच वापर केला जातोय हे आपण विसरतो. पण यामुळे मुलं स्मार्ट फोन च्या आहारी जात आहेत असे एकूण चित्र तयार होताना दिसतं आहे.
सोशल मीडियाचा वापर वाढतो आहे; पण योग्य वापर केल्यास यासारखे उत्तम टूल मिळणे कठीण ! असे माझे मत आहे. हा वापर सगळ्या वयोगटातील मंडळी करताना आढळतात पण एका सर्वेक्षणानुसार २२ टक्के किशोरवयीन मुले सोशल मीडियावर दिवसातून किमान दहावेळा लॉग इन करतात आणि यातूनच सुरु होते सायबर गुंडगिरी, एखाद्या विषयातून निराशा येणे, जाणते-अजाणतेपणी अश्लील व्हिडिओ, फोटो पाहिले जाणे आणि त्याची आवड निर्माण होणे हे सगळं न संपणारं आहे. मग हे थांबेल कसं? यावर काही पर्याय आहे का? खालील बाबींकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष ठेवल्यास या विषयात मदत होऊ शकते असं वाटते.
१३ वर्षांच्या आतील मुलांना फेसबुक वापरायची परवानगी फेसबुक देत नाही पण मुलं त्यांच्या आई-वडिलांचे खाते वापरतात, ते वापरणे बंद करता येऊ शकते. पालकांच्या खात्यावरून मित्र-मैत्रिणींना संपर्क साधला जातो, संवाद साधला जातो ते थांबणे आवश्यक आहे. तुमच्या इंटरनेट व फेसबुक वापरण्याचे गोपनीयता सेटिंग्ज पडताळून पाहा. ते कडक असावेत याची काळजी घ्या.
तुमच्या कॉम्प्युटरवर फिल्टरिंग सॉफ्टवेअरचा वापर करावा, यामुळे नकोशा वाटणाºया साईट्स बंद करता येऊ शकते. नेट नॅनी, प्युअर साईट पीसी अशा फिल्टरिंग सॉफ्टवेअरच्या सहाय्याने हे करता येणे सहज शक्य आहे. तुमच्या स्मार्ट फोन वर देखील तुम्ही फिल्टरिंग सॉफ्टवेअरचा वापर करू शकता ज्यामध्ये माय मोबाईल वॉच डॉगचे नाव घेता येईल.
नियमांचा वापर करावा. कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोन वापरण्याचे नियम तयार करून द्यावेत आणि त्याचे तंतोतंत पालन होते आहे का हे पहावे. यासाठी थोडी मेहनत पालकांना देखील घ्यावी लागेल. नियम फक्त तुमच्या समोर पाळले जातात की तुम्ही नसतानाही पाळले जातात हे पाहणे याठिकाणी महत्त्वाचे आहे.
मुलांच्या सवयी काय आहेत, कशा आहेत याची कल्पना आई-वडील दोघांनाही असावी. पाल्य कोणत्या साईटला जास्त वेळा भेट देतो, तीच साईट का? याबद्दल पालकांना ज्ञान हवे. फेसबुकवर कोणत्या मित्र-मैत्रिणी सोबत त्याचे संवाद होत आहेत याची देखील माहिती पालकांना हवी.
कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोनचा वापर करण्याची जागा ही खासगी असू नये याची काळजी घ्या. घरातील सगळे जिथे उपलब्ध असतात अशाच ठिकाणी कॉम्प्युटर, स्मार्ट फोन हाताळण्याची मुभा मुलांना असावी.
स्मार्ट फोन वापरत असताना विविध प्रकारच्या आॅफर्स समोर येत असतात त्यांना क्लिक न-करण्याची ताकीद मुलांना देणे पालकांना जास्त सोईचे होऊ शकते.
आॅनलाईन असताना आपला पाल्य कोणत्या प्रकारचे चित्र / माहिती पोस्ट करत आहे याची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे. मूल तुमचे अनुकरण करीत असतात याचे भान ठेवा. तुम्ही ज्या प्रकारे स्मार्ट फोनचा वापर कराल त्याच प्रकारे मुलंही करणार हे लक्षात घ्या. त्यांच्यासाठी तुम्ही उत्तम उदाहरण आहात.
स्मार्ट फोनचा वापर मुलांनी कधी करावा यासाठी वेळ निर्धारित करा.आॅनलाईन प्रतिष्ठेबद्दल मुलांना माहिती द्या. काय शेयर करावे काय नाही याबद्दल मार्गदर्शन करा. एखादा मेसेज अथवा एखादे चित्र भविष्यात अडचणी निर्माण करू शकतं याचे ज्ञान मुलांना देणे आवश्यक आहे.कॉम्प्युटर अथवा स्मार्ट फोन वापराबद्दल मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे.तुम्ही म्हणाल कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोनचा वापर पूर्णपणे आम्हालाही माहिती नाही तर आम्ही मुलांना काय सांगणार? हो ना? तर मग याचं उत्तर साधं आणि सरळ आहे तुम्ही माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. पुढाकार घ्या, ज्ञान आत्मसात करा आणि ते मुलांसोबत शेयर करा. सर्वात महत्त्वाचं मुलांवर विश्वास ठेवा. सोशल मीडिया हाताळण्यासाठी आणि सुजाण पालकत्वासाठी खूप खूप शुभेच्छा ! - अमित कामतकर (लेखक संगणकतज्ज्ञ व समुपदेशक आहेत.)