मोहन डावरे
पटवर्धन कुरोली : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. अनेकजण नवीन नोकरी, व्यवसायाच्या शोधात आहेत. तर काहीजणांनी स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले आहे; मात्र पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे संजय मगर या अभियंत्याने लॉकडाऊनमुळे पुणे सोडले. गावात येऊन विचार करत न बसता केळीच्या पिकात आव्हान म्हणून कलिंगडाचे आंतरपीक घेतले आणि पाचएकरात तब्बल ६ लाखांचे उत्पन्न मिळविले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावात आलेले काही तरूण पुढे काय होणार, या विचारात राहिले. मात्र संजय मगर यांनी गावाकडे आल्यानंतर केळीच्या बागेत पाच एकर कलिंगड लावण्याचे ठरविले. त्यानुसार ठराविक अंतरावर दोन केळीच्या खुटामध्ये कलिंगडाची लागवड केली. कलिंगडाची लागवड करताना त्यांना केळी व्यतिरिक्त एकरी ६० हजार रूपयांचा खर्च आला, असे एकूण ५ एकराचे तीन लाख रूपये खर्च आला.
कलिंगडाचे पीक अवघ्या तीन महिन्यात काढणीस आले. मध्यंतरी उन्हाळ्याच्या प्रारंभी कलिंगडाची आवक जास्त असल्याने दर कोसळले होते. यानंतर मात्र रमजान सुरू झाला. संजय मगर यांच्या कलिंगडाला सरासरी किलोमागे ५ रूपयांपासून ९ रूपयांपर्यंत दर मिळाला. तरीही ५ एकरामध्ये तब्बल १५० टनापेक्षा जास्त उत्पादन मिळाल्याने त्यांना तब्बल ६ लाख रूपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. मशागत व लागवडीचा खर्च वजा जाता त्यांना ३ लाख रूपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. या कलिंगड उत्पादनात पुणेस्थित असलेली आपले कुटुंब व परिवारातील लोकांनीही सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
ये-जा करणाºयांसाठी कलिंगडाचा प्लॉट खुला- कलिंगडाची तोडणी सुरू झाल्यानंतर अभियंता असलेल्या संजय मगर यांनी व्हॉटस्अॅप, फेसबुक, दूरध्वनीद्वारे या कलिंगड प्लॉटची जाहिरात केली. प्रत्येकाला फोन करून कलिंगड खाण्यासाठी येण्याचे आवाहन केल्याने पटवर्धन कुरोली, शेवते, नांदोरे, देवडे, पिराची कुरोलीसह इतर गावात असलेले मित्र, सगेसोयरे, वाटसरू यांच्यासाठी पूर्ण महिनाभर कलिंगडाचा प्लॉट खाण्यासाठी खुला केला होता. कलिंगड खाण्यासाठी येणारा घरी नेण्यासाठीही मोफत देण्यात येत होते. यानंतरही कलिंगडाचे मोठे उत्पन्न मिळाले आहे. या अभियंता शेतकºयाचे कौतुक होत आहे.