सोलापूर : केंद्राने सोलापूरचा स्मार्टसिटीच्या योजनेत समावेश केला खरा पण मागील दोन वर्षापासून शहरात स्मार्टसिटी योजनेतंर्गत कोणतेही काम पूर्ण झाले नाही, नुसताच स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हणून गवगवा सरकार करीत आहे. या स्मार्टसिटीच्या कामाविरोधात सोलापूरातील सामाजिक कार्यकर्ते राजू प्याटी यांनी बुधवारी हुतात्मा चौकात अभिनव आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदविला.
राज्य आणि केंद्र सरकार केवळ घोषणाबाजी करतं, काम मात्र काही करत नाही, असं बोलत निषेध करण्यासाठी त्याने हवेत खेळणीच्या बंदुकीने गोळीबार केला. शहर हागणदारी मुक्त करण्यात दुर्लक्ष केलं जात असल्याने त्याने उघड्यावर कमोड मांडून प्रातिनिधिक आंदोलन केलं.
सोलापूर शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाला खरा पण कचरा उचलला जात नाही, सार्वजनिक शौचालय आणि मुता-या या दुर्गंधीमय झाल्या आहेत. वेळेवर पाणी मिळत नाही, रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय नाही, परिवहनची सेवा ठप्प आहे, शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे, स्मार्टसिटीच्या विकासकामांचा शहरात बोजवारा उडाला आहे. सरकारनं केवळ स्मार्टसिटीचं चॉकलेट लोकांना दाखवललयं का असा सवाल करीत सामाजिक कार्यकर्ते राजू प्याटी यांनी हुतात्मा चौकातील सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयासमोरील मुतारीसमोर अभिनव आंदोलन करून सरकारच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. याचवेळी राजू प्याटी यांनी तोंडाला काळे लावून घेऊन भाजप सरकारच्या विविध योजनांचा निषेध नोंदविला़