अक्कलकोट : केवळ स्वच्छता अन् सफाई करण्यासाठी शिपाई नाही म्हणून अक्कलकोट येथील मृद व जलसंधारण कार्यालय सतत बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना बंद दरवाजा पाहून आल्या पावलाने माघारी जावे लागत आहे.
एकेकाळी या कार्यालयात नागरिकांची सतत वर्दळ असायची; पण आता उलट स्थिती झाली आहे. सर्वत्र मोकाट जनावरे फिरत आहेत. या कार्यालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चोहोबाजूंनी तारेचे तटबंदी होती. पूर्वी आवश्यक तेवढे चौकीदार व शिपाई होते. आता हे सर्वकाही नसल्याने चित्र उलट झालेले आहे.
अनेक गावातील शेतकरी भूसंपादनसंबंधी महिती घेण्यासाठी व इतर कामांसाठी वारंवार येतात; मात्र कार्यालयास टाळे ठोकलेले पाहून आजूबाजूला चौकशी करून आल्या पावलाने परत जात आहेत. एक नाही दोन नाही तर तब्बल महिनाभर कार्यालय उघडले जात नाही. हा प्रकार मागील एक वर्षांपासून सुरू आहे. कार्यालय परिसरात झाडेझुडपे वाढल्यामुळे कार्यालयच दिसेनासे झाले आहे.
रिक्त पदांची संख्या
शाखा अभियंता २, लिपिक जागा ३ असून, दोघेजण सोलापूरच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. वरिष्ठ लिपिक जागा-१ असून, तेही रिक्त आहे. स्थापत्य अभियांत्रिकी अधिकारी यांना प्रत्येकी एक सहायक असतो. तीन जागा असून, सर्व जागा रिक्त आहेत. चौकीदार-१ ,शिपाई-१ ,चालक-१ जागा असून, सर्व रिक्त आहेत. वसाहतीची पडझड झालेली आहे. गोडावून मोडकळीस आलेले आहे.
कोट ::::::::::::
या कार्यालयात निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहेत. विशेषतः शिपाई, चौकीदार जागा रिक्त असल्याने ऑफिस उघडणे अवघड आहे. यामुळे ऑफिस बंद असते. संबंधित लिपिकवर्गाला सांगितले असता, ऑफिस उघडणे आमचे काम नाही म्हणून माझ्याशी हुज्जत घालतात. शासन रिक्त जागा भरत नाही, मी काय करणार.
एस.पी. लब्बा,
उपअभियंता, मृद जलसंधारण उपविभाग
फोटो
०३अक्कलकोट -मालिका ०१
ओळी
अक्कलकोट येथील बंद अवस्थेत असलेले मृद व जलसंधारण कार्यालय.