- बाळकृष्ण दोड्डीसोलापूर - कोणार्क एक्सप्रेसमधून उतरलेल्या तीन संशयित प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या बॅगेतून ४३ किलो ४०० ग्रॅम गांजा सापडला असून, साधारण त्याची किंमत एक लाख ८६ हजार सहाशे रुपये इतकी आहे. एकूण वीस पाकीट गांजा जप्त करण्यात आला आहे.
या तिघांवर गुन्हा दाखल झाला असून आरपीएस तसेच जीआरपी पोलिसांकडून बुधवारी, सायंकाळी साडेसात वाजता ही कारवाई झाली आहे. आरपीएफचे मंडल आयुक्त प्रशांत संसारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली असून त्या युवकांची सखोल चौकशी सुरू आहे.
मुन्ना संतोष बारीक वय २३, (रा. जि. गंजम, ओडिशा), (लक्ष्मण रवी नायर, वय ३२, रा. रत्नागिरी), (इकबाल फकरुद्दीन खान, वय २८ जि. कोरोल, राजस्थान) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सदर तिघेही बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता कोणार्क एक्सप्रेसमधून (क्रमांक ११०२०) फलाट क्रमांक चारवर उतरले. याबाबत पोलिसांनी आधीच माहिती मिळाल्याने ते पाळत ठेवून होते. काही युवक तीन बॅगा तर दोन ट्रॅव्हल्स बॅगांमध्ये गांजा घेऊन जात असल्याची माहिती आरपीएफ तसेच जीआरएफ अधिकाऱ्यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार मंडल आयुक्त प्रशांत संसारे यांच्या नेतृत्वाखाली आरपीएफचे बाळासाहेब चौगुले, सचिन नागरगोजे, धर्मण्णा काेरे, उमेश येलगे यांनी स्टेशनवर पाळत ठेवला. कोणार्क एक्सप्रेसमधून उतरलेले युवक संशयितपणे फिरताना दिसले. त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. त्यांच्या बॅगांची तपासणी केली. त्यात ४३ किलो गांजा सापडला.