- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील मार्केट यार्ड चौकात ७६ लाख ४३ हजार ३७६ रूपये किंमतीचा रंगमिश्रित व किटकबाधित सुपारीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने सोलापुरात पकडला. याप्रकरणी पुढील कारवाई वेगाने करण्यात येत आहे.
याबाबत अन्न व औषध प्रशासनाने सांगितले की, २७ जून २०२४ रोजी विशेष पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापुरातील मार्केट यार्ड चौकात केए १४ सी ७५१५, केए १४ सी ०८५० व केए १४ सी ४६१९ या वाहनांची अचानक तपासणी केली असता त्यात रंगमिश्रित व किटकबाधित सुपारीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी किटकबाधित व रंगमिश्रित अन्नपदार्थाचे नमुने ताब्यात घेतले. कमी दर्जाच्या संशयावरून ७३ हजार ४९३ किलो माल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत पुढील कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथकाचे सहाय्यक आयुक्त सा.ए. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे, उमेश भुसे, रेणुका पाटील तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने पूर्ण केली.