- दीपक दुपारगुडे सोलापूर - विठ्ठलाचे जलद दर्शन घडवून भाविकांकडून पैसे घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सागर बडवे व शंतनु उत्पात (दोघे रा. पंढरपूर) यांच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बडवे व उत्पात यांनी तुळशीपूजेचे निमित्त करून समितीचे व्यवस्थापकांची भेट घेतली अन् महिला सुरक्षारक्षक यांना दोन इसमांना दर्शनास सोडण्यास सांगितले आहे, असे खोटे सांगून दोन इसमांना दर्शनास सोडण्याचा प्रयत्न करुन समितीच्या कर्मचाऱ्याची फसवणूक केल्याची फिर्याद देण्यात आली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मंदिर परिसरात राहणारे सागर बडवे व शंतनु उत्पात हे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे आले. त्यापैकी सागर बडवे हा व्यवस्थापक पुदलवाड यांच्या केबिनमध्ये जाऊन समोरील लोकांना तुळशीपूजा करावयाची आहे असे सांगितल्याने पुदलवाड यांनी त्यांना नित्योपचार विभागाकडून तुळशीपूजा करावयाची परवानगी घेण्यास सांगितले.
तुळशीपूजेची पावती न करता सागर बडवे व शंतनु उत्पात हे विठ्ठल सभा मंडप येथे दोन इसमांना घेऊन आले महिला सुरक्षारक्षक प्रज्ञा वट्टमवार यांना रावसाहेबांनी या दोन इसमांना दर्शनास सोडण्यास सांगितले असल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोन इसम आतमध्ये गेल्यानंतर तो प्रकार सीसीटीव्ही कर्मचारी प्रकाश पाटील यांच्या लक्षात आल्याने बीडीडीएस पोलिस कर्मचारी वामन यलमार, महिला सुरक्षा कर्मचारी प्रज्ञा वट्टमवार या सर्वांनी मिळून त्यांना दर्शनाला न सोडता परत कार्यालयात आणून व्यवस्थापक पुदलवाड यांच्याकडे विचारपूस केली. यावेळी प्रकार उघडकीस आला.