सोलापूर : पालखीद्वारे देवाचे स्मरण करीत अक्कलकोटडे निघालेल्या पालखीतील तरुणाला पाठिमागून येणाऱ्या दुचाकीनं धडक दिली. यात तो तरुण थेट बाजूने जाणाऱ्या टँकरच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास यावली फाट्याजवळ ही धक्कादायक घटना घडली. जखीमीला बेशुद्धावस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा वाटेत मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
संकेत श्रावण निकम (वय- २२, रा. सावरगाव, ता. येवला, जि. नाशिक) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यातील मयत संकेत हा नाशिक जिल्ह्यातील सावरगाव येथून पायी पालखीद्वारे अक्कलकोटकडे निघाले होते. दरमजल करीत ही पालखी शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास मोहोळ तालुक्यातील यावली फाट्याजवळ आलेली होती.
दरम्यान, पाठिमागून सुसाट मोटारसायकलस्वाराने वरील तरुणाला धडक दिली. यामुळे तो तरुण बाजूने जाणाऱ्या एल. पी. जी. गॅस वाहतून नेणाऱ्या टँकरच्या चाकाखाली गेल्यानं गंभीर जखमी झाला. तातडीने रुग्णवाहिकेद्वारे बेशुद्धावस्थेत मदतनीस विलास काकडे यांनी त्याला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.