- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : शहरात वाढत असलेल्या धुळीमुळे लोकांना त्रास होत आहे. आरोग्याच्या विविध समस्या जाणवत आहेत. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या आम आदमी पक्षाने शुक्रवारी सकाळी महापालिकेत अनोखे आंदोलन केले. आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलनकर्त्यांनी धुळीने आंघोळ केली. यावेळी विविध घोषणा देत आंदोलनकर्ते महापालिकेत सर्वांचे लक्ष वेधले.
शहरात ड्रेनेज लाईनची कामे मोठया प्रमाणात सुरू आहेत. रस्त्यांचीही कामे सुरू आहेत. मात्र ही कामे निकृष्ट पध्दतीने करण्यात येत आहेत. याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. जनतेला त्रास देण्याचे काम महापालिका प्रशासन करतेय. वाढत्या धुळीमुळं फुफ्फुस, कर्करोगासारखं गंभीर आजार होत आहेत. वारंवार पत्र, निवेदन, तक्रार, चर्चा करूनही महापालिका सातत्याने या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. जाणीवपूर्वक सोलापूरकरांना त्रास देण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. धुळीने आंघोळ करून महापालिकेचे लक्ष वेधले आहे. धुळ कमी न झाल्यास आज आम्ही धुळीने आंघोळ केली आहे, उद्या गरज पडली तर तुम्हालाही धुळीने आंघोळ घालू असा इशाराही आम आदमी पक्षाने दिला आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.