विलास जळकोटकरसोलापूर: उन्हाळ्याचे दिवस आणि शाळा- महाविद्यालयांना सुट्ट्यांमुळे लग्नसराई आणि पै-पाहुण्यांकडे वाढलेल्या वर्दळीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीसह सर्वच बसच्या माध्यमातून मे महिन्यातल्या अवघ्या २० दिवसांत एस. टी. बसने ५ कोटी ३८ लाख १० हजार ६०१ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६४ लाख उत्पन्न वाढले आहे. यंदा नव्यानेच सुरू झालेल्या शिवशाहीनेही १ कोटी २३ लाख १० हजार ६०१ रुपयांचा गल्ला जमवला. यंदाचा उन्हाळा हंगाम एस. टी.ला पावला असल्याचे दिसून आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने खासगी प्रवासी वाहतुकीला तोडीस तोड शह देण्यासाठी आता कात टाकत नवनवीन योजना, आरामदायी बस या माध्यमातून प्रवाशांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाचे भाग्य फळफळले असल्याचे दिसून येते.
मे महिना उजाडताच लग्नसराई आणि सुट्ट्यांच्या कालावधीमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी लक्षात घेऊन सोलापूर आगाराने नियोजन आखले. तरीही मध्यरात्रीपर्यंत प्रवासी बसच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र वेळोवेळी पाहायला मिळाले. सोलापूर विभागाकडून दर अर्ध्या तासाला लांब पल्ल्याच्या सोलापूर-पुणे या गाड्यांचे नियोजन प्रवाशांना सोयीचे ठरले. १ ते २० मे २०१८ या २० दिवसांच्या काळात ४ कोटी १५ लाख रुपये उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६४ लाखांनी उत्पन्न वाढून भारमानही ७.५ टक्क्यांनी वाढल्याचे आगारप्रमुख विवेक हिप्पळगावकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
सोलापूर आगाराच्या अखत्यारित सध्या उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ या तीन तालुक्यांचा अंतर्भाव आहे. सोलापूर आगारामध्ये सद्यस्थितीला १५८ बसेस असून, यामध्ये २१ शिवशाही, ३० निमआराम १ (हिरकणी, एशियाड) आणि साध्या लाल बसेस असा समावेश आहे. मोहोळ हा कंट्रोल पॉर्इंट आगाराच्या अखत्यारित आहे. सोलापूर-पुणे मार्गावर १५ आणि सोलापूर-हैदराबाद मार्गावर ५ गाड्या धावत आहेत. चालक-वाहक, वर्कशॉपमधील कर्मचारी आणि प्रशासनाच्या नियोजनामुळे यंदाचा उन्हाळा सोलापूर आगारास फलदायी ठरल्याचे सांगण्यात आले.
असा आहे उत्पन्नाचा आकडा- १ ते २० मे या कालावधीत सोलापूर आगाराला नाशिक, पुणे, हैदराबाद अशा विविध मार्गांवर धावलेल्या बसेसद्वारे ४ कोटी १५ लाख रुपये मिळाले. गतवर्षीपेक्षा ६४ लाखांचे उत्पन्न वाढले. लग्नसराई, सुट्टीच्या कालावधीशिवाय यंदा अधिक महिना सुरुवात झाल्याचाही उत्पन्न वाढीमागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. जूनमध्ये सुरू झालेल्या शिवशाहीच्या आरामदायी प्रवासामुळेही प्रवासी महामंडळाच्या बसकडे आकर्षित झाल्याचे शिवशाहीने १९ दिवसात मिळवलेल्या १ कोटी २३ लाख १० हजार ६०१ रु. उत्पन्नाच्या आकडेवरून दिसून येते.
कर्मचाºयांची खंत- ज्यांच्या घामाच्या बळावर एस. टी. हा गल्ला जमवत आहे त्या कर्मचाºयांच्या वेतनाबद्दल मात्र शासन चालढकल करीत असल्याबद्दल चालक-वाहकांसह कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे आम्ही करीत असलेल्या चोख कामगिरीमुळे एस.टी.ला चांगले दिवस येत असताना आमच्याकडे मात्र सहानुभूतीने कोणी पाहत नसल्याबद्दलची खंत कर्मचाºयांनी लोकमतकडे व्यक्त केली.
अक्कलकोट-बार्शीला भाडेतत्त्वावर शिवशाही- राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बससेवेशिवाय महामंडळाने भाडेतत्वावर कि. मी. अंतराप्रमाणे शिवशाही बस प्रवाशांसाठी घेण्यात आल्या आहेत. सोलापूर विभागातील अक्कलकोट व बार्शी आगाराकडे त्या कार्यरत आहेत. या सेवेत वाहक महामंडळाचा आहे मात्र चालक खासगी यंत्रणेचा आहे. महामंडळ प्रशासनाचे त्याच्यावर नियंत्रण नसल्याचे सांगण्यात येत आहे. याचा बससेवेवर परिणाम होऊ नये अशी अपेक्षा प्रवाशांमधून होत आहे.