सोलापूर : जुलैअखेर होटगी रोडवरील विमानतळासंदर्भातील अडथळे पूर्ण होतील. त्यादृष्टीने विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात लक्ष घालावे, याबाबतची मागणी देणारे निवेदन सोलापूर विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी नागरी उड्डाण मंत्रालय व डीजीसीएला दिले आहे.
सोलापुरातून विमान सेवा देण्यास तीन कंपन्यांनी दोन आठवड्यापूर्वीच सोलापूर विचार मंचला उत्सुकता दर्शवली होती. सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके यांनी आठ विमान कंपन्यांना सोलापुरातून नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, तिरुपती व बेंगलोर या ठिकाणी पहिल्या टप्प्यात उडान योजनेअंतर्गत विमानसेवा द्यावी असे प्रस्ताव पाठवले असता लगेचच स्टार एअर, फ्लाय बिग व इंडिगो या तीन कंपन्यांनी त्यांना त्या कंपन्या सोलापुरातून विमानसेवा देण्यास उत्सुक असल्याचे कळवले होते.
सोलापूरातून विमानसेवा सुरू करण्यास काही बाबींची पूर्तता तात्काळ करून जुलै अखेर तातडीने विमानसेवा सुरू करावी याबाबतचा पत्रव्यवहार पुन्हा एकदा करण्यात आला आहे. उडान योजनेचे सरव्यवस्थापक अतुल्य अग्रवाल यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे. सोलापुरातून लवकरात लवकर विमानसेवा सुरू होण्याबाबत आता सर्व व्यापारी, उद्योजक व सोलापूरकरांनी सातत्याने मागणी केली तर ही विमानसेवा लवकर सुरू होऊ शकेल असे विचार मंचचे म्हणणे आहे.