- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - दौंड येथून उजनी देणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ झाली असून, उजनीची पाणीपातळी झपाट्याने वाढून टक्केवारी ४३.८० झाली आहे. दौंड येथून ३२९८२ क्युसेक विसर्ग येत असून, मागील चार दिवसांत उजनी धरणात मोठया प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे धरणातील उपयुक्त साठा २३.४७ टीएमसी एवढा झाला आहे, तर एकूण जलसाठ्यामध्येही वाढ झाली आहे. धरणाची वाटचाल ५० टक्क्यांकडे झपाट्याने चालू आहे. यामुळे शेतकरी बांधव सुखावला आहे.
रविवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी पहाटेपर्यंत साेलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यातील तलाव, ओढे, नाल्यातून मोठया प्रमाणात पाणी वाहत आहे. मागील २४ तासात सोलापूर जिल्ह्यात ४९ मिलीमीटर पावस पडल्याची नोंद झाली आहे. शिवाय पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मागील दहा ते बारा दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने उजनीच्या वरील बहुतेक सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्याने त्यामधून सोडलेले पाणी बंडगार्डन व दौंडपर्यंत पोहोचले असल्याने सोमवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार उजनी धरण ४३.८० टक्क्यावर पोहोचले आहे. दौंडमधून येणारा हा विसर्ग चालू हंगामातील सर्वांत मोठा आहे.