सोलापूर : सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांना उत्कृष्ट तपासासाठीचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे पदक जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ११ अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. डॉ. टिपरे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचारप्रकरणी उत्कृष्ट तपास केला होता.
डॉ. प्रीती टिपरे यांनी सोलापुरात सहायक पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून आजतागायत बहुतांश गुन्ह्यांचा तपास चांगल्या पद्धतीने लावला आहे. दि.११ फेब्रुवारी २०२० रोजी कॉलेजमध्ये शिकणारी एक अल्पवयीन मुलगी विजापूर राेडवर एका मंदिराजवळ रडत बसली होती.
ती आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. तेव्हा एका समाज सेवकाने मुलीजवळ जाऊन तिची चौकशी केली. मुलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या समाजसेवकाने विजापूर नाका पोलिसांना माहिती दिली. तात्काळ पोलीस मुलगी बसलेल्या ठिकाणी आले. तिला पोलीस ठाण्यात नेले, त्यानंतर चौकशी केली असता तिच्यावर रिक्षा चालकांनी सामूहिक अत्याचार झाल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच डाॅ. प्रीती टिपरे या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यांनी सखोल चौकशी करून तात्काळ पाच आरोपींना अटक केली. भादंवि कलम ३७६, पोस्को व ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपासामध्ये त्यांनी आरोपींचा माग घेत अणखी सहा जणांना अटक केली. अवघ्या ३० दिवसांत एकूण ११ आरोपी अटक झाले होते. आरोपी अद्याप जेलमध्ये आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता, त्याचा कसून तपास केला. मुलीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने सखोल तपास केला. अवघ्या ३० दिवसांत दोषारोपत्र तयार करून न्यायालयात पाठवले आहे. केलेल्या कामाची पोहोचपावती मिळाली असून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने जाहीर केलेल्या पदकामुळे खूप आनंद झाला आहे.
-डॉ. प्रीती टिपरे, सहायक पोलीस आयुक्त.