- राकेश कदमसोलापूर - सोलापूर विकास मंच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या आडून शहराची कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप बोरामणी विमानतळ विकास व सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीच्या सदस्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यात सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत असल्याचा अहवाल डिजीसीएने दिला आहे. या अहवालाच्या आधारे महापालिकेने कारखान्याची चिमणी ४५ दिवसात हटवण्यात यावी अशी नोटीस कारखान्याला बजावली आहे. महापालिकेने ४५ दिवसानंतर चिमणी न हटवल्यास जन आंदोलन उभारू असा इशारा सोलापूर विकास मंचने दिला होता. या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर कारखाना बचाव समितीचे सदस्य रा.गो. म्हेत्रस, दत्ता थोरे, रावसाहेब पाटील, दिनेश शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. थोरे म्हणाले, महापालिकेने कारखान्याला ४५ दिवसाची मुदत दिली आहे. कारखाना आणि महापालिकेत न्यायालय लढाई सुरू आहे. तरीही सोलापूर विकास मंच सदस्य चिथावणीखोर वक्तव्य करून शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर देऊ .