- विलास जळकोटकर सोलापूर - सोलापूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विविध भागातून बनावट चावीच्या आधारे बाईक चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी असाच प्रयत्न करणाऱ्या दोघांना एका तरुणाच्या सतर्कतेमुळे त्यांचा बेत फसला. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून ठाण्यात आणले. येथे त्यांना कलम ३७९, ५११ अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले. सुनील गणपत शिवशरण (वय- २१, रा. बुधवार पेठ, सोलापूर), बुद्धभूषण राजाभाऊ गायकवाड (वय- २३, रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत.
यातील अधिक माहिती अशी की, फिर्यादी विठ्ठल नारायण आवताडे (वय- २९, रा. हिरज, ता. उत्तर सोलापूर) हा तरुण तलाठी परीक्षा असल्यामुळे हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अभ्यासिकेत रोडच्या कडेला बाईक पार्क करुन अभ्यासाला बसला होता. अचानक पत्नीचा मोबाईल आला म्हणून तो बाहेर आला. त्यावेळी त्याच्या मोटारसायकलीजवळ दोघे संशयित आरोपी वेगवेगळ्या बाईकच्या बनावट चाव्यांद्वारे बाईक चालू करण्याचा प्रयत्न करीत होते. फिर्यादीने पोलिसांना खबर देऊन तक्रार दिली असता दोघांविरुद तक्रार नोंदवली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना नोटीस बजावून पुन्हा असे कृत्य न करण्याची समज देऊन सोडून देण्यात आले. अधिक तपास पोलीस नाईक कामूर्ती करीत आहेत.